Tuesday , August 18 2026
Breaking News

नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Spread the love

विधानसभेत, विधान परिषदेतही गदारोळ

बंगळूर : वाल्मीकी विकास महामंडळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप आणि जनता दल (एस)च्या सदस्यांनी सोमवारी विधानसभेसह विधान परिषदेत जोरदार आंदोलन केले. नागेंद्र यांना मंत्रिमंडळातून तातडीने हटवावे, अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला. त्यामुळे दोन्ही सभागृहांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी हनूर तालुक्यातील कावेरी वन्यजीव अभयारण्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करून सरकारने निवेदन करावे, अशी मागणी केली. वनमंत्र्यांनी याबाबत निवेदन केल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न सभापती जी.एस. पाटील यांनी केला.

मात्र भाजपचे सुनील कुमार यांनी नागेंद्र यांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेतला. वाल्मीकी महामंडळातील निधी गैरव्यवहाराच्या प्रकरणात त्यांचा यापूर्वी राजीनामा घेण्यात आला होता. आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

आर. अशोक यांनीही नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले असून नागेंद्र यांचे नाव प्रमुख आरोपी म्हणून असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी अशोक यांनी केली.

भाजपचे अश्वत्थनारायण यांच्यासह इतर सदस्यांनीही घोषणाबाजी करत आंदोलन केले. ‘नागेंद्र राजीनामा द्या’, ‘नागेंद्र यांना बडतर्फ करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. सभापतींनी पूर्वसूचना न देता विषय मांडणे योग्य नसल्याचे सांगून प्रश्नोत्तराचा तास सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले. मात्र विरोधकांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. मंत्री कृष्ण बैरेगौडा यांनी विरोधकांचे वर्तन नियमबाह्य असल्याचा आरोप केला. अखेर सभापतींनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

विधान परिषदेतही मागणी
विधान परिषदेतही विरोधकांनी नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिमंडळात का घेण्यात आले, असा सवाल केला. सभापती सलीम अहमद यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजप-धजद सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. अखेर गोंधळातच कामकाज सुरू ठेवून सभागृह दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *