
बेंगळुरू : कारागृहातील कैद्यांसोबत महिला पोलिस अधिकाऱ्याने अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने काही दिवसांपासून खळबळ उडाली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांविरुद्ध बेंगळुरूतील कब्बन पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महिला अधिकाऱ्याने रौडीशीटर साईकुमार आणि धर्म यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी, धर्म याच्याशी काही वर्षांपूर्वी जवळीक असल्याचे तसेच त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना त्याने संभाषण रेकॉर्ड केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ साईकुमारकडे देऊन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या व्हिडिओमुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असून, आपली बदनामी झाल्याचे महिला अधिकाऱ्याने म्हटले आहे. आपण मेट्रो स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत असून विवाहित असून आपली मुले आहेत, त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करून आपली प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कब्बन पार्क पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध एनसीआर नोंदवला असून, पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, व्हिडिओतील आरोपांची तसेच तो नेमका कधी आणि कसा रेकॉर्ड करण्यात आला, याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta