Thursday , August 20 2026
Breaking News

बालमनातील कवितेतून संस्कार आणि समाजप्रबोधन घडावे : निळूभाऊ नार्वेकर

Spread the love

 

बेळगाव येथे दुसरे बालकवी संमेलन उत्साहात; ५७ बालकवींनी सादर केल्या कविता
बेळगाव : बालमनातील कविता प्रत्येकाच्या मनाला भावणारी आणि गोड वाटणारी असते. कवितेतील भावार्थ, रचनेमागील अंतर्मन आणि शब्दांचा अर्थ यांना विशेष महत्त्व असते. केवळ शब्दांची जुळवाजुळव करून कविता रचल्याने तिच्यात साहित्यिक मूल्य निर्माण होत नाही. रचनात्मक कविता समाजाला प्रेरणा, प्रबोधन आणि संस्कार देणारी असावी. अशा आशयपूर्ण काव्यरचनेलाच भविष्यात महत्त्व प्राप्त होईल, असा विचार ज्येष्ठ साहित्यिक व कवी निळूभाऊ नार्वेकर यांनी व्यक्त केला.

बेळगाव येथे राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, विश्व भारत सेवा समिती, बेळगाव आणि तारांगण महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहापूर कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात आयोजित दुसऱ्या बालकवी संमेलन २०२६ मध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

“कविता ही साहित्याची दुसरी बाजू असून, साहित्याच्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम होते. बालकवींनी आपल्या मनातील भावना, संस्कार आणि सामाजिक जाणीवा कवितेतून मांडाव्यात,” असे निळूभाऊ नार्वेकर यांनी सांगितले.

‘साहित्यातून माणूस घडतो’ – गुणवंत पाटील
ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी अंतर्मनातून उमटलेल्या काव्यपंक्ती ही साहित्याची खरी जोड असल्याचे सांगितले. कवितेतील प्रत्येक शब्दाला अर्थ आणि भाव असणे आवश्यक आहे. अर्थपूर्ण शब्दांतून निर्माण होणारी कविता कवीमनाला तसेच रसिकांच्या मनालाही स्पर्श करते. साहित्य माणसाला बोलके, संवेदनशील आणि संस्कारित करते. त्यामुळे साहित्यातूनच माणूस घडतो, असे त्यांनी सांगितले. गुणवंत पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

बालकवींनी सादर केला कवितांचा सार
या संमेलनात बेळगाव परिसरातील जवळपास सात ते आठ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ५७ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बालकवींनी विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

विद्यार्थ्यांच्या कवितांमध्ये संस्कार, समाजप्रबोधन, आई-वडिलांची प्रेरणा, गुरुजनांविषयी आदर, निसर्ग, देशप्रेम आणि सामाजिक मूल्ये अशा विविध विषयांचा समावेश होता. बालकवींच्या सादरीकरणातून त्यांच्या कल्पनाशक्तीबरोबरच संवेदनशीलता आणि साहित्यिक जाणही दिसून आली.

सर्व सहभागी बालकवींना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

ग्रंथपालांचा विशेष सन्मान
यावेळी खानापूर व बेळगाव परिसरात निस्वार्थ भावनेने ग्रंथालय सेवा बजावणाऱ्या ग्रंथपालांचा श्रीफळ, शाल व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये श्री. बाळू जायानाचे (धामणे), श्री. पिराजी कुऱ्हाडे (खानापूर), सौ. जयश्री सुतार (शहापूर), श्री. यशवंत देसाई (बेळगाव) आणि श्री. सुशील धामणेकर (मच्छे) यांचा गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या, निवृत्त प्राध्यापिका मनीषा नाडगौडा यांचाही सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक व स्वागत विश्व भारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदीहळ्ळी यांनी केले. तारांगण व सहकारी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा अरुणा गोजे-पाटील यांनी मांडला.

यावेळी उद्योजक श्री. अप्पासाहेब गुरव, श्री. प्रकाश नंदीहळ्ळी, श्री. बाळासाहेब देसूरकर, ऍड. सुधीर चव्हाण, डॉ. दत्तप्रसाद गिजरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. संमेलनातील विविध वक्त्यांनी बालसाहित्य, कविता, वाचनसंस्कृती आणि संस्कार याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी जाधव यांनी केले.

यावेळी केंद्र संचालिका सुधा माणगावकर, नेत्रा मेनसे , अर्चना पाटील, अस्मिता आळतेकर, स्मिता किल्लेकर, कवी बसवंत शहापूरकर, चंद्रशेखर गायकवाड, गुरुनाथ किरमिटे, प्रतिभा सडेकर पालक, शिक्षक उपस्थित होते.

बालकवींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि दर्जेदार काव्य सादरीकरणामुळे दुसरे बालकवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

About Belgaum Varta

Check Also

टूल होल्डर्स कंपनीतर्फे कामगारांच्या गुणवंत मुलांमुलींना शैक्षणिक मदत

Spread the love  बेळगाव : टूल होल्डर्स कंपनीचे मालक कै. दिलीप पांडुरंग भागवत यांच्या प्रथम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *