
बेळगाव : शहरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. सुरेश मुनिस्वामी जालगार (वय ४१, रा. कपिलेश्वर मंदिरामागे, जालगार गल्ली, बेळगाव) याला बेळगाव शहरातून हद्दपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश जालगार हा सन २००५ पासून मारामारी, लुटमार, जुगार, बेकायदेशीर जमाव करून शस्त्र बाळगणे तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासारख्या विविध बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याविरुद्ध बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या कथित बेकायदेशीर कारवायांना आळा बसला नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि भविष्यातही त्याच्याकडून धोकादायक कृत्ये होण्याची शक्यता लक्षात घेऊन बेळगाव शहर पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी कर्नाटक पोलीस कायदा कलम ५५ (अ) अंतर्गत १८ ऑगस्ट २०२६ रोजी हद्दपारीचा आदेश जारी केला.
दरम्यान, समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या किंवा बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा पोलीस नियंत्रण कक्षाला देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta