
अनेक राज्यांपर्यंत विस्ताराची शक्यता
बंगळूर : तावरेकेरे येथील दोड्डेरी परिसरात उघडकीस आलेल्या बनावट औषधांच्या रॅकेटचे जाळे देशातील अनेक राज्यांपर्यंत विस्तारले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनंतर देशातील सर्व राज्यांचे औषध नियंत्रक आणि राज्य परवाना प्राधिकरणांना सतर्क करण्यात आले आहे. बंगळुरच्या या रॅकेटचा मुंबई, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशासह अन्य राज्यांशी संबंध असल्याची शक्यता तपासली जात आहे.
कर्नाटकच्या औषध दक्षता पथकाने १८ ऑगस्ट रोजी बिदडीजवळील क्रमांक ३४, कुरुबरहळ्ळी गावातील विनापरवाना औषधनिर्मिती केंद्रावर छापा टाकला. या कारवाईत बनावट औषधे, मोठ्या प्रमाणातील औषधसाठा, पॅकेजिंग यंत्रे, रिकाम्या व्हायल्स आणि बनावट लेबल्स जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या साहित्याची एकूण अंदाजे किंमत ५ कोटी ५ लाख ४९ हजार ५७५ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा
हे प्रकरण आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असण्याची शक्यता असल्याने कर्नाटकच्या औषध गुणवत्ता विभागाने देशातील सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना पत्र पाठविले आहे. संशयास्पद लेबल असलेली औषधे किंवा कर्नाटकात प्रतिबंधित केलेल्या बॅचची औषधे आढळल्यास तातडीने माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यातील खासगी रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि औषध वितरकांनाही सतर्क करण्यात आले असून, प्रतिबंधित बॅचची औषधे वापरली जात आहेत का, याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबईपर्यंत संबंध असल्याचा संशय
अपर औषध नियंत्रक डॉ. उमेश यांच्या माहितीनुसार, प्रमुख घाऊक औषध बाजारपेठा, वितरण केंद्रे आणि किरकोळ मेडिकल दुकानांमध्ये अचानक तपासणी करण्याच्या सूचना अन्य राज्यांना देण्यात आल्या आहेत. विशेषतः संशयास्पद किंवा कागदपत्रे नसलेला औषधसाठा आहे का, याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
महागडी औषधे विकणाऱ्या वितरकांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी तसेच औषधांचा मूळ स्रोत तपासण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कमी किमतीची औषधे घेऊन बनावट लेबल
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील उत्पादन केंद्रांमधून कमी किमतीची जेनेरिक औषधे आणून ती कर्नाटकातील विनापरवाना केंद्रात नव्या व्हायल्समध्ये भरली जात होती. त्यावर बनावट लेबल लावून ही औषधे महागड्या आयात औषधांच्या नावाने विकली जात असल्याचा संशय आहे.
कॅन्सरवरील महागडी इंजेक्शनेही लक्ष्य
या रॅकेटमध्ये कॅन्सरसह गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या इंजेक्शननाही लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आल्याने चिंता वाढली आहे. बनावट औषधांमुळे रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे ऑन्कोलॉजिस्ट, डॉक्टर आणि फार्मसींना महागड्या आयात औषधांच्या पॅकेजिंगची बारकाईने तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद पॅकेजिंग, बॅचची नोंद नसणे किंवा औषधाच्या स्रोताबाबत शंका असल्यास तत्काळ तो साठा ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे संबंधित केंद्रात केवळ बनावट औषधे तयार केली जात नव्हती, तर त्यासाठी बनावट पॅकेजिंग आणि लेबलिंगची स्वतंत्र व्यवस्थाही असल्याचा संशय बळावला आहे.
विविध राज्यांत बाजारपेठांची तपासणी
तपास सुरू असताना देशातील विविध राज्यांमध्ये औषध बाजारपेठांची तपासणी करून त्याचे अहवाल आणि माहिती परस्परांमध्ये सामायिक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समन्वित कारवाईद्वारे बनावट औषधांच्या संपूर्ण आंतरराज्यीय नेटवर्कचा शोध घेण्याचा औषध नियंत्रण विभागाचा प्रयत्न आहे.

Belgaum Varta Belgaum Varta