Friday , August 21 2026
Breaking News

शिक्षक भरतीत मराठी माध्यमाच्या १९५ जागांचा तातडीने समावेश करा : आमदार विठ्ठल हलगेकर यांची मागणी

Spread the love

 

 

खानापूर : कर्नाटकातील सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत रिक्त असलेल्या मराठी माध्यमाच्या १९५ शिक्षक पदांचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार हलगेकर यांनी सरकारला पत्र पाठवून मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या डी.एड. आणि बी.एड. पात्रताधारक उमेदवारांवर होणारा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.

कर्नाटक शिक्षण विभागामार्फत राज्यात सुमारे १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. बेळगाव विभागासाठी यापूर्वी ३३१ शिक्षक पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भरती अधिसूचनेत मराठी तसेच इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या रिक्त पदांचा समावेश करण्यात आलेला नसल्याचे आमदार हलगेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

खानापूर तालुक्यात एकूण २९७ शिक्षक पदे रिक्त असून, त्यापैकी तब्बल १९५ पदे मराठी माध्यमाची आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मराठी माध्यमाच्या रिक्त पदांचा भरती प्रक्रियेत समावेश न झाल्यास पात्र मराठी उमेदवारांच्या रोजगाराच्या संधीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक शाळांची गरज आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षक भरतीच्या विद्यमान अधिसूचनेत मराठी माध्यमाच्या सर्व १९५ रिक्त पदांचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी आमदार हलगेकर यांनी केली आहे.

सरकारने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करावी आणि पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केसरेकर कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत द्या

Spread the love  महाराष्ट्र एकीकरण समितीचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन खानापूर : कुपवाड (जि. सांगली) येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *