
खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुलांवर आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. या अनाथ मुलांच्या भवितव्याचा विचार करून कर्नाटक सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल सोमाण्णा हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे केली आहे.
हेब्बाळ येथील मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा मोहन केसरेकर हे रोजगारासाठी महाराष्ट्रात गेले होते. १५ ऑगस्ट रोजी कुपवाड एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे अज्ञात कारणातून त्यांच्यावर हातोडी व चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनिषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मोहन केसरेकर यांचाही १८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.
काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबातील कमावते आई-वडील गमावल्याने मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्राचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोहन केसरेकर यांचे नातेवाईक श्रीधर केसरेकर यांच्याशी संपर्क साधून कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच केसरेकर यांच्या मुलगा व मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे आमदार हलगेकर यांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत आमदार हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना पत्र पाठविले असून, मानवतेच्या दृष्टिकोनातून केसरेकर कुटुंबातील दोन मुलांच्या भवितव्यासाठी कर्नाटक सरकारने योग्य ती आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta