Saturday , August 22 2026
Breaking News

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात राखीच्या धाग्यातून स्वयंरोजगार अन् सृजनशीलतेचा सुंदर फुलला संगम

Spread the love

 

खानापूर : भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण हा केवळ परंपरेचे जतन करणारा नसून आपुलकी, संस्कृती आणि सामाजिक सलोखा वाढवणारा सण आहे. या सणाचे औचित्य साधून, मराठा मंडळाच्या शिक्षण संस्थेच्या प्रेरणादायी अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून व मराठा मंडळाचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव यांच्या उपस्थितीत म.मं. ताराराणी पी. यू. कॉलेज, खानापूर येथे विद्यार्थिनींमध्ये व्यावसायिक कौशल्य, स्वावलंबन, कलागुण जोपासना आणि आत्मनिर्भरतेची बिजे रोपणारा एक कौतुकास्पद ‘राखी मेकिंग व विक्री उपक्रम’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे, खानापूर तालुक्यातील हे पहिलेच मुलींचे एकमेव कॉलेज आहे, जिथे महिला सक्षमीकरणाचा असा स्तुत्य उपक्रम मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हाती घेतला जात आहे.
या उपक्रमाची सुरुवात अतिशय रंजक आणि ज्ञानवर्धक वातावरणात झाली. बेळगांवच्या नामांकित चित्रकला शिक्षिका श्रीमती लता नगरे यांच्या मार्गदर्शनातून कॉलेजच्या हिंदी विषयाच्या प्राध्यापिका श्रीमती मंगल देसाई आणि विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक, आकर्षक आणि सुबक राख्या बनवण्याचे विशेष आणि तांत्रिक प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करत विद्यार्थिनींनी बाजारातून रेडीमेड राख्या आणून विकण्याऐवजी, स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून अत्यंत मनमोहक व सुबक राख्या स्वतःच्या हातातून तयार केल्या.
जेव्हा या मुलींनी रंगीबेरंगी रेशमी धागे, मणी आणि पर्यावरणपूरक वस्तू वापरून आपल्या हाताने या राख्या बनवल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद झळकत होता. स्वतः तयार केलेल्या या राख्या पाहून आपणही काहीतरी सुंदर आणि स्वावलंबी निर्माण करू शकतो, या भावनेने त्यांच्या मनामध्ये जो प्रचंड स्वाभिमान आणि आनंद निर्माण झाला, तो शब्दांत सांगता येणार नाही. यातून त्यांना भविष्यातील उद्योजकतेचे पहिले व महत्त्वाचे धडे मिळाले.
सर्वात विशेष आणि अभिमानास्पद बाब म्हणजे, विद्यार्थिनींनी अभ्यासाचे कोणतेही नुकसान होऊ न देता, आपल्या फावल्या वेळेत आणि विश्रांतीच्या क्षणांत हा संपूर्ण उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला. शिक्षणासोबतच वेळेचे व्यवस्थापन, श्रमप्रतिष्ठा आणि कलागुणांचा योग्य वापर कसा करावा, याचा एक आदर्श नमुनाच त्यांनी या माध्यमातून सादर केला.
प्राध्यापिका मंगल देसाई यांनी या संपूर्ण उपक्रमाचे अतिशय यशस्वी आणि प्रभावी नियोजन केले, तर वाणिज्य विभागाचे प्राध्यापक व फायनान्स हेड श्री. पी. व्ही. कर्लेकर यांनी या उपक्रमातील आर्थिक नियोजन, हिशोब आणि विक्रीचे व्यवस्थापन अत्यंत चोखपणे सांभाळले. या उपक्रमात कॉलेजमधील प्रथम आणि द्वितीय वर्षातील हुशार आणि उत्साही विद्यार्थिनी. कुमारी सोनी केरकर, चित्रा कुरबर, शुभांगी गावडा, फातिमा, मुक्ता अनगडकर, कॉलेजची जी.एस. वैशाली गुरव, पौर्णिमा गावडे आणि इतर अनेक विद्यार्थिनींनी अभूतपूर्व पुढाकार घेतला आणि स्वतः तयार केलेल्या राख्यांची यशस्वी विक्री करून उत्तम व्यावसायिक कौशल्य दाखवून दिले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजच्या संपूर्ण प्राध्यापक वर्गाने आणि कर्मचाऱ्यांनी ज्यात एन. ए. पाटील, टी. आर. जाधव, सुनीता कणबरकर, जयश्री शिवटणकर, आर. व्ही. मरितमनवर, वनिता गावडे, नितीन देसाई, आर. पी. धबाले, सीमा पाटील आणि सातेरी यांचा समावेश आहे……मोठी मेहनत घेत विशेष परिश्रम घेतले. कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी रक्षाबंधनाचे सांस्कृतिक महत्त्व उपस्थितांसमोर अधोरेखित करतानाच, विद्यार्थिनींच्या या कर्तृत्त्वाची व कल्पकतेची भरभरून प्रशंसा केली. तसेच या संपूर्ण उपक्रमाला खंबीर साथ देणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही त्यांनी जाहीर कौतुक केले.
राखीच्या या रेशमी धाग्यांनी खानापूर तालुक्यातील ताराराणी कॉलेजच्या या लेकींना केवळ उद्योजकतेचे धडेच दिले नाहीत, तर महिला सक्षमीकरणाचा एक नवा आणि तेजाळलेला मार्गही दाखवून दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजीतील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; ४३ वर्षांनंतर एकत्र येत शाळांप्रती कृतज्ञता व्यक्त

Spread the love  गर्लगुंजी : गर्लगुंजी गावातील मराठी प्राथमिक शाळेच्या १९८१-८२ च्या इयत्ता सातवीच्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *