Saturday , August 22 2026
Breaking News

ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत साजरा करा; डीजेला पूर्णपणे बंदी

Spread the love

 

बेळगाव : ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त, विविध विभागांचे अधिकारी तसेच सीरत कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मिरवणुकीत डीजेला पूर्णपणे बंदी

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व धार्मिक मिरवणुकांमध्ये डीजे बंदी लागू असून, या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह सीरत कमिटीचे पदाधिकारी व आयोजकांना दिले.

उत्सवाच्या नावाखाली ध्वनीची स्पर्धा वाढविण्याऐवजी शांतता आणि सामाजिक सलोखा जपण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

वीजवाहिन्यांबाबत खबरदारीच्या सूचना

मिरवणुकीच्या मार्गावरील वीजवाहिन्यांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वीजपुरवठ्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना हेस्कॉम अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच संवेदनशील ठिकाणांची पाहणी, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

शांतता समित्यांच्या बैठका

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यापूर्वीच शांतता समित्यांच्या बैठका घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर चर्चा करून उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार आसिफ सेठ यांच्याकडून प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत

आमदार आसिफ सेठ यांनी प्रशासनाच्या डीजे बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. ईद-ए-मिलादचा संदेश हा अमन, शांतता, बंधुभाव आणि गरजूंच्या मदतीचा आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत आणि शिस्तीत साजरा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ईद-ए-मिलाद उत्सवात शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

इस्कॉनतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

Spread the love  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने येत्या 4 सप्टेंबर रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *