


जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर गोळीबार; १५ पथकांकडून हल्लेखोरांचा शोध
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याच्या वृत्ताने मुंबईत खळबळ उडाली आहे. जुहू येथील ‘पुष्पा पार्क’ परिसरात, जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर ही घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित असून, त्याचा चालक आणि उमेश चव्हाण नामक चाहता जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुटबॉल सामना खेळून टायगर श्रॉफ आपल्या चालकासोबत घरी परतत होता. त्याला पाहण्यासाठी परिसरात चाहत्यांची गर्दी जमली होती. याच वेळी दुचाकींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या कारवर गोळीबार केला. काही वृत्तांमध्ये सात, तर काही ठिकाणी दहा गोळ्या झाडल्याचा उल्लेख आहे. जखमींना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सहभागाचाही तपास
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग आहे का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारी फेसबुक पोस्ट समोर आल्याचे वृत्त आहे. या पोस्टमध्ये अनिल पंडित आणि हरमन संधू यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
गोळीबाराची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाल्याचे सांगण्यात येत असून, फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. हल्लेखोर गोळीबारानंतर एस. व्ही. रोडमार्गे विलेपार्ले आणि पुढे अंधेरीच्या दिशेने पसार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी १५ पथके तैनात केली आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून तपासाचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. तसेच तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे.
मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांचे प्रश्न
या घटनेनंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार, बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आता टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबाराचा संदर्भ देत नागरिकांच्या सुरक्षेबाबत सरकारला जाब विचारला.
झिशान सिद्दीकी यांनीही मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी अद्याप न्याय मिळालेला नसल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत अशा घटना घडणे गंभीर असल्याचे मत त्यांनी मांडले.
दरम्यान, गोळीबारामागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोण आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta