Friday , October 23 2026
Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

Spread the love

 

 

लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधू कांबीकर यांचे पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. दमदार अभिनय, प्रभावी संवादफेक आणि लावणी सादर करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वाची मोठी हानी झाली असून लावणी क्षेत्रातील एक महत्त्वाचे पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मधू कांबीकर यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयातून मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. चित्रपटांमध्ये आई, सासू यांसह विविध व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. ‘झपाटलेला’, ‘डेबू’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘माझा छकुला’ आणि ‘एक होता विदूषक’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या. अभिनयाबरोबरच लावणी कलाकार म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले.

लावणीच्या कार्यक्रमादरम्यान पक्षाघाताचा झटका

२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तब्बल १२ वर्षांनंतर मधू कांबीकर या कार्यक्रमातून पुन्हा लावणी सादर करत होत्या. कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी जिद्दीने भैरवी सादर केली. मात्र, त्यानंतर मेकअप रूममध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला. या झटक्याचा त्यांच्या उजव्या हातावर परिणाम झाला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या समस्या वाढल्या आणि त्यांच्या कलात्मक कारकिर्दीवर मर्यादा आल्या.

जीवनगौरव पुरस्काराने गौरव

२०१८ मध्ये झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मधू कांबीकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांच्या सुनेने, शीतल जाधव यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

आपल्या अभिनयातून आणि लावणीच्या सादरीकरणातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि लावणी क्षेत्रातील कलाकारांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कलात्मक योगदानाची आठवण रसिकांच्या मनात कायम राहील.

About Belgaum Varta

Check Also

दुष्काळ दौऱ्यात शशिकांत शिंदेंसमोर सीमाप्रश्नाचा मुद्दा; बेळगाव-खानापूरच्या युवा शिष्टमंडळाला भेटण्याचे आश्वासन

Spread the love  रायगड (नरेश पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *