Sunday , October 4 2026
Breaking News

दुष्काळ दौऱ्यात शशिकांत शिंदेंसमोर सीमाप्रश्नाचा मुद्दा; बेळगाव-खानापूरच्या युवा शिष्टमंडळाला भेटण्याचे आश्वासन

Spread the love

 

रायगड (नरेश पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी रायगड जिल्ह्याचा एकदिवसीय दुष्काळ पाहणी दौरा केला. रायगडमधील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, दुबार पेरणी, पिकांची झालेली हानी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी पाहणी करून संबंधित परिस्थिती जाणून घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली.

दरम्यान, पत्रकारांनी शशिकांत शिंदे यांना दुष्काळाच्या प्रश्नांसोबतच राज्यातील इतर राजकीय व प्रशासकीय विषयांबाबतही प्रश्न विचारले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाचा मुद्दा, दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीसंदर्भातील प्रश्न, अद्याप एफआयआर दाखल झाल्याबाबत उपस्थित केलेले मुद्दे तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरही यावेळी चर्चा झाली.

याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा रायगडच्या प्रतिनिधीने आमदार शशिकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला. बेळगाव सीमाभागातील मराठी बांधवांचा आणि सीमाप्रश्नाचा विषय उपस्थित करण्यात आल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी, “आज मी दुष्काळाच्या प्रश्नासाठी दौऱ्यावर आलो आहे. त्यामुळे सीमाप्रश्नावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही,” अशी भूमिका स्पष्ट केली.

मात्र, रायगडच्या प्रतिनिधीने पुढे पुण्यात स्थायिक असलेल्या बेळगाव, खानापूर परिसरातील युवा नेत्यांकडून, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा सीमा समितीच्या माध्यमातून, रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी शशिकांत शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंतीही करण्यात आली.

यावर शशिकांत शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित शिष्टमंडळाला वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे योग्य ठरेल, असे सांगितले. तसेच शिष्टमंडळ भेटीस आल्यास त्यांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे निश्चितपणे ऐकून घेण्याचे त्यांनी मान्य केले.

दुष्काळाच्या प्रश्नासाठी आयोजित पत्रकार संवादात इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेत असताना सीमाभागातील (बेळगाव) संवेदनशील आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला सीमाप्रश्न रायगडच्या पत्रकाराने उपस्थित केल्याने या विषयाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले. विशेष म्हणजे रायगडमधील दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान सीमाप्रश्नाचा उल्लेख झाल्याने शशिकांत शिंदे यांनीही या विषयाची दखल घेतली.

दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणाऱ्या प्रस्तावित भेटीत बेळगाव-खानापूर भागातील युवा कार्यकर्ते सीमाभागातील परिस्थिती, मराठी भाषिकांचे प्रश्न आणि सीमाप्रश्नाशी संबंधित विविध बाबी शशिकांत शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती आहे. या भेटीत नेमकी कोणती भूमिका किंवा पुढील दिशा समोर येते, याकडे सीमाभागातील संबंधितांचे लक्ष लागले आहे.

रायगडमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या दौऱ्यात स्थानिक शेतकरी प्रश्नांसोबतच सीमाभागाचा मुद्दाही चर्चेत आल्याने या संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पुण्यात महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाची बैठक संपन्न; बिदर-भालकीसह सीमाभागाच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा

Spread the love  पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला पुन्हा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, पुणे विभागाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *