






बेळगाव : कर्नाटक पत्रकार संघटनेच्या नावाचा गैरवापर करून अधिकारी व सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावत पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप खानापूर येथील तीन पत्रकारांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी मास्केनट्टी गावातील ज्योतिबा गंगाराम बेंडिगेरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर अडवून त्यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या निदर्शनास बाब आणून दिल्यानंतर संबंधितांकडे १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मागितलेली रक्कम न दिल्यास याबाबत बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
खानापूर येथील प्रसन्ना कुंभार, नागेश नाईकर आणि जावेद मोकाशी या तिघांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. पत्रकार संघटनेच्या नावाचा आधार घेत अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपांची सत्यता पडताळावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ज्योतिबा बेंडिगेरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
या प्रकरणातील आरोपांची अद्याप अधिकृत पडताळणी झालेली नसून, पोलिसांच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta