






कावळेवाडी : कवींचा सन्मान ज्या समाजात केला जातो तोच खरा श्रीमंत आहे. मराठीला समृद्ध करण्यासाठी विविध विषयावर कवी शब्दांत मांडणी करतो. चांगली कविता सादर करून रसिकांची मने जिंकून कवी आपल्या भावना व्यक्त करत असतो. कवी संवेदनशील असतात. अशा उपक्रमातून मराठी भाषा संवर्धनासाठी हितावह ठरते ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले अनुभव लेखणीतून व्यक्त करु शकतो असा विश्वास वाटतो असे मौलिक विचार मालोजीराव अष्टेकर यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
माध्यमिक विद्यालय कर्ले येथे निमंत्रित कवींचे कविसंमेलन उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर उपस्थित होते. प्रारंभी शाळेतील विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. फोटो पूजन क्रीडा शिक्षक प्रकाश शेळके व निवृत्त शिक्षक नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक वाय. पी. नाईक यांनी करून मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला हवा. वाचन, लेखन चिंतन मनन करणे गरजेचे आहे विद्यार्थीदशेत मराठी पुस्तके वाचून गोडी निर्माण व्हावी.
उपस्थित मान्यवरांचे संस्थेतर्फे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आशयपूर्ण लयबध्द कविता वाचनाचे संमेलन पार पडले. यामध्ये सीमाभागातील कवी शिवाजी शिंदे, बसवंत शहापूरकर, सीमा कणबरकर, सुधाकर गावडे, मधु पाटील, कवयित्री रोशनी हुंदरे, प्रा. मनीषा नाडगौडा, शंकर चौगुले, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, वाय पी नाईक, सूरज मोरे यांनी आपल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
कवी बसवंत शहापूरकर यांनी ‘बालपण’ ही कविता छान आवाजात गाऊन सादर केली. माझ्या आईच्या डोळ्यात, होते दारिद्र्याचे पाणी.चटणी भाकरीलाही तेव्हा, होती किती गोडी.
कवयित्री सीमा कणबरकर आपल्या दोन कविता, स्वार्थाचा बाजार, ‘चालायचे एकट्याने’ त्या कवितेतून सांगतात.. स्वार्थाचा बाजार मांडला कसा माणसाने, सोडली रे लाज देवा इथे माणसाने.
चालायचे एकट्याने एकटेच आता, तुझा सूर्य, तुझी वाट शोध तूच आता.
मनीषा नाडगौडा यांनी: विद्यार्थी: ही कविता, शिवाजी शिंदे यांनी ‘झालाच पाहिजे’ या कवितेत मराठी माणसाचं जगणं, भावना व्यक्त केली आहे. किरमटे यांनी कलियुग, मराठीचा सेवेकरी, या दोन कविता प्रभावीपणे सादर करून रंगत आणली.
रोशनी हुंदरे यांनी ‘रावण’ ही कविता सादर करून आजच्या
काळातील स्त्रीचं आयुष्य कसं भरडले जात आहे यावर भाष्य करताना दिसते
मधु पाटील यांनी ‘माझी शाळा’ ही कविता सादर करुन शाळेच्या आठवणी जाग्या केल्या. शिवाजी शिंदे यांनी आपल्या ओघवत्या उत्स्फूर्तपणे निवेदन करुन काव्य मैफिलीची शोभा वाढवली.
या कविसंमेलनाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेऊन समाधान व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. के. एम. सातेरी आभार के. जी. मेणसे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाय. एन. बुरुड, वीणा गोजेकर, पूजा डेळेकर, जोतिबा कदम, शुभम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी पालक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta