






विजयपूर : इंडी मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून तो सोडवला जात नसल्याने आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर आमच्या इंडीला महाराष्ट्र राज्यात सामील करण्याची मागणी करावी लागेल, असे मार्मिक विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानाची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
विजयपूर येथील जिल्हा पंचायत सभागृहात पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केडीपी बैठकीत ते बोलत होते. इंडी मतदारसंघातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन आलो आहे. महाराष्ट्रात असतो तर किमान पाण्याची समस्या तरी सुटली असती का, असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना टोला लगावला.
आलमट्टी धरणातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व भागांना समान पाणी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पावसाळ्यात धरणात किती पाण्याची आवक झाली, तलाव भरण्यासाठी आणि अन्य कारणांसाठी कोणत्या नियोजनानुसार पाणी सोडण्यात आले, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून मागितली.
आयसीसी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पाणीवाटपात अनियमितता होत आहे. विशेषतः कालव्यांच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसून, प्रत्येक सिंचन योजनेत त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी नियमितपणे केडीपी बैठक आयोजित करावी. पाणीवाटपाचे नियोजन, आतापर्यंत झालेली कार्यवाही आणि आगामी उपाययोजनांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta