Sunday , November 22 2026
Breaking News

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापतींकडून आढावा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथे २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील आणि विधान परिषद सभापती सलीम अहमद यांनी सुवर्ण विधानसौधला भेट देऊन अधिवेशनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

हिवाळी अधिवेशन सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दोन्ही सभागृहांचे प्रमुख बेळगावात दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अधिवेशनादरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यानंतर विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील आणि विधान परिषद सभापती सलीम अहमद यांनी सुवर्ण विधानसौधमधील विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांची पाहणी केली. अध्यक्षांचे आसन, मंत्री व आमदारांसाठीची आसनव्यवस्था, अधिकारी कक्ष, माध्यम प्रतिनिधींसाठीची व्यवस्था तसेच नागरिकांसाठीच्या प्रेक्षक गॅलरीची त्यांनी तपासणी केली.

याशिवाय सभागृहातील ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच अधिवेशन काळात लोकप्रतिनिधी, अधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दोन्ही सभागृहांच्या प्रमुखांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौध परिसरात प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *