Sunday , November 22 2026
Breaking News

‘रात्र निवासाचे आम्ही स्टार’ म्हणत शिशू वर्गातील मुले रमली रात्रनिवास शाळेत

Spread the love

 

बेळगाव -मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये बालवाडीचा रात्रनिवास कार्यक्रम

बेळगाव : शाळेचा परिसर म्हटला की, अभ्यासाची गडबड आणि दप्तराचे ओझे डोळ्यासमोर येते. मात्र, दिनांक 21 नोव्हेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेतील बालवाडीतील शिशू वर्गातील चिमुकल्यांसाठी एक अनोखा ‘रात्रनिवास’ उपक्रम राबवण्यात आला. घरातून पहिल्यांदाच आई- बाबांशिवाय रात्रभर शिक्षकताई आणि बालवाडी कर्मचारी यांच्यासमवेत शाळेत मजा-मस्ती, खेळ, नाचगाणी, खाऊ यांचा अनुभव घेताना या लहान मुलांच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
शनिवार दि. 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता डोक्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कागदी टोप्या घालून मुलांचे आगमन झाले. आगमन झाल्यानंतर प्रार्थना, संस्कार गीत, अखंड म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला ‘भडंग आणि ऊसाचा रस यावर मुलांनी ताव मारला. यानंतर पालकांनी आपल्या मुलांसोबत ‘रात्रनिवासाचे स्टार’ या कार्यक्रमात सादरीकरण केले. यामध्ये नाच, पोवाडा, नाटुकले, गोष्ट अशा विविध प्रकारच्या सादरीकरणांमध्ये मुलं आणि पालक दंगून गेले होते. शेवटी बालवाडीतील ताईंनी “अंधाराची जादू आणि चांदण्याची पार्टी” यावर एक छोटेसे नाटुकले सादर केले. यानंतर मुलांची संगीत खुर्ची आणि डान्स यामध्ये संपूर्ण शाळेचा परिसर मुलांच्या किलबिलाटाने दुमदुमून गेला होता.
रात्री 9.30 वाजता सर्व मुलांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यात शिरा, गुलाबजाम, बटाटा फ्लॉवर मिक्स भाजी, पापड, पुलाव, वरण अशा स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर शेकोटी पेटवण्यात आली. शेकोटी भोवती गोल फिरत “बेळगावचा म्हातारा शेकोटीला आला…..” या गाण्यावर मुलांनी ताल धरला. यानंतर मुलांनी शिक्षकांनी सांगितलेल्या गाण्यांवर मुलांनी मस्त ताल धरुन डान्स केला. यानंतर मुलांना आईस्क्रीम देण्यात आले. आईस्क्रीम मुलांसाठी विशेष आवडणारा पदार्थ ठरला.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांसमवेत 35 हून अधिक पालकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. सजावटीपासून ते स्वयंपाक बनवण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या पालक आणि शिक्षक आणि बालवाडी कर्मचारी यांनी मिळून पार पाडल्या. कार्यक्रमाच्या शेवटी पालकांना आभार पत्र देण्यात आले.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, रेणू पवार, नयन परमोजी, भारती शिराळे, अश्विनी हलगेकर, वरदा देसाई, प्रतिभा चौथे, तेजश्री हंडे, श्रद्धा पावशे, मंजुषा पाटील, सुनिता पाटील, संज्योत बांदेकर, धीरजसिंह राजपूत, दत्ता पाटील, आशा जाधव, वैभवी मोरे, किशोर पवार या सर्वांनी मुलांची विशेष काळजी घेऊन कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

आज सकाळी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी मुलांनी व्यायाम करून दूध आणि बिस्किटांचा आस्वाद घेतला. अशाप्रकारे उपक्रमाची सांगता झाली. एकूण 80 मुले या रात्रनिवासात सहभागी झाली होती. मुलांमध्ये स्वावलंबन, शिस्त आणि एकमेकांशी जुळवून घेण्याची वृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने घेण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापतींकडून आढावा

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथे २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *