Sunday , November 22 2026
Breaking News

शतक महोत्सवी म्युनिसिपल हायस्कूलकडे दुर्लक्ष

Spread the love

 

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याची मागणी ; शहरवासीयातून जाळपोळीचा निषेध

निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहराच्या शैक्षणिक इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या येथील म्युनिसिपल हायस्कूल मधील वर्ग खोल्यांची मोडतोड आणि कागदपत्रांची जाळपोळ झाली आहे. त्यामुळे शहरवासीयातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवाय या घटनेचा शिक्षण प्रेमींनी निषेध व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षण व संवर्धनाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
अशा ऐतिहासिक वास्तूचे व संस्थाचे जतन करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
सन १९२३ च्या प्राथमिक शिक्षण कायद्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळात बेळगाव जिल्ह्यातील निपाणी नगरपालिकेने आपल्या शहरातील शैक्षणिक संस्था स्वतःच्या जबाबदारीवर चालविण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार तत्कालीन मुंबई सरकारने नगरपालिकेला स्थानिक प्राधिकरण म्हणून मान्यता देऊन शाळा चालविण्यास परवानगी दिली होती. ही घटना शैक्षणिक इतिहासातील अभिमानास्पद व गौरवशाली बाब आहे.
या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी अनेक आमदार, खासदार, शास्त्रज्ञ, कुलगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र ऐतिहासिक शाळेच्या इमारतीची आणि शैक्षणिक व्यवस्थापनाची अवस्था गंभीर झाली आहे. ग्रंथालयासह कार्यालयातील शैक्षणिक साहित्याची नासधूस झाल्याचे तसेच महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे जाळण्यात आल्याचे समोर आली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात दूरदृष्टीने शाळा चालविण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या नगरपालिकेला त्या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी का जाणवत नाही? पालिकेच्या दुर्लक्षामुळे शैक्षणिक इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू नामशेष होणार का, असा संतप्त सवाल जनता विचारला जात आहे.


——————————————————————–
‘नगरपालिका प्रशासनाने ऐतिहासिक वास्तूची तातडीने पाहणी करून इमारतीचे संरक्षण, दुरुस्ती व संवर्धन करावे. शाळेतील जुनी कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य आणि ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षित ठेवावेत. झालेल्या नासधुसची चौकशी करावी.
शैक्षणिक इतिहास जपणे ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून शहराची सामूहिक जबाबदारी आहे. माजी विद्यार्थी, नागरिक, शिक्षणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवून या ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी एकत्र यावे.’
-प्रा. राजन चिकोडे, माजी सभापती, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव ‘अरिहंत’ संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सेलन्स इन बिझनेस ग्रोथ २०२६’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love  निपाणी (वार्ता) : सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आर्थिक प्रगतीसह व्यावसाय वाढीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *