






प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी; बोरगावमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांनी डॉक्टर, अभियंता किंवा वकील व्हावे असे वाटते. मात्र, बदलत्या काळात क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलांची स्वप्ने केवळ शिक्षणापुरती मर्यादित न ठेवता त्यांना क्रीडा मैदानापर्यंत पोहोचवले पाहिजे. मुलांना मैदानावर खेळण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले.
येथील आर. ए. पाटील पब्लिक स्कूलमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
संस्थेच्या संचालिका विनयश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विनयश्री पाटील म्हणाल्या की, खेळ हे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. मैदानावर खेळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सांघिक भावना आणि संयम निर्माण होतो. तसेच अडचणी व पराभवांना सामोरे जाऊन त्यातून सावरण्याची ताकदही मिळते.
व्हॉलीबॉल अकादमीचे मुख्य प्रशिक्षक सचिन फुटाणकर यांनीही पालकांना मुलांच्या आवडीनिवडी आणि कल ओळखून त्यांना योग्य संधी देण्याचे आवाहन केले. मुलांच्या भविष्याचा विचार करताना स्वतःची मते त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास डॉ. मिथुन देशपांडे, संचालक अण्णासाहेब भोजकर, प्राचार्य श्रीनिवास, सीईओ बाळासाहेब हावले, शमिका शाह, विनोद शिरहट्टी, आर. एम. मगदूम, क्रीडाशिक्षक सुकुमार गोरवाडे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta