






गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही नाराजी
खानापूर : तालुक्यातील पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (ता. २०) खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात बैठक झाली. गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे कर्जाच्या परतफेडीसाठी वळते करू नयेत, असा स्पष्ट इशारा बँकांना देण्यात आला. तसेच रेशन वितरणातील अनियमितता आणि अपुऱ्या माहितीवरून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी प्रास्ताविक केले. गृहज्योती योजनेची माहिती देताना अधिकारी प्रवीण बरगाले यांनी ऑक्टोबर महिन्यात खानापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना २ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांची वीजबिल सवलत मिळाल्याचे सांगितले. यावेळी मोदेकोप येथील विठ्ठल मोतापा कानशिडे, अरुण माणगांवकर आणि विलास कानशिडे यांच्या शेतातील ऊस जळाल्याच्या घटनेबाबत समितीने विचारणा केली. ट्रान्सफॉर्मरमधून ठिणगी पडल्याने आग लागल्याचे पंचनाम्यात नमूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
फुलेवाडी येथील ट्रान्सफॉर्मर जागेअभावी बदलण्यात विलंब होत असल्याचे बरगाले यांनी सांगितले. यावर कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले. इदलहोंड शाळेजवळील माळअंकले रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मर पुढील महिन्यात बदलण्यात येईल, असेही सांगण्यात आले. नंदगड विभागाचे अधिकारी वीरेश चकडीमठ यांच्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न प्रकाश मादार यांनी उपस्थित केला. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले.
गृहलक्ष्मी योजनेची माहिती देताना अधिकारी संदीप देशमुख यांनी तालुक्यात ६७ हजार ४३२ लाभार्थी असून दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे १३ कोटी ४४ लाख ३२ हजार रुपये वितरित होत असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी काही बँका लाभार्थ्यांच्या गृहलक्ष्मी योजनेतील दोन हजार रुपयांच्या रकमेतून कर्जाची परतफेड करून घेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे लाभार्थ्यांचे पैसे वळते करू नयेत, याबाबत सीडीपीओ कार्यालयाने सर्व बँकांना पत्र द्यावे, असे निर्देश दिले. नियमबाह्य पद्धतीने पैसे वळते केल्यास संबंधित बँकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला. प्रथम, गुंजी आणि जांबोटी येथील प्रगती बँकांना नोटीस देण्याची सूचना करण्यात आली.
अन्न व नागरी पुरवठा विभागाचे निरीक्षक संतोष यमकनमर्डी यांच्याकडे समितीने मागील १७ बैठकांमध्ये मागितलेली माहिती अद्याप पूर्णपणे सादर न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढील बैठकीत सर्व माहिती सविस्तर सादर करावी, अन्यथा विभागावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव मांडण्यात आला.
तसेच गर्लगुंजी येथील श्रीमती विजया पुंडलिक पाटील या महिला स्वतः जिवंत असतानाही रेशन कार्डमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करून नाव वगळल्याची तक्रार घेऊन बैठकीला उपस्थित राहिल्या. यावर निरीक्षकांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यांचे नाव पुन्हा रेशन कार्डमध्ये समाविष्ट करून कार्ड देण्याचे आदेश समितीने दिले. तसेच अशा प्रकारची घटना बाबत आहार विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून याबाबत योग्य ती पावले उचलणार असल्याचे सूर्यकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
घरात कोणीही नसलेल्या अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना आणि वृद्धांना घरपोच रेशन देण्याच्या योजनेची तालुक्यातील अंमलबजावणी किती जणांना झाली, याची दुकाननिहाय यादी पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. खानापूर शहरात काही रेशन दुकानदार लाभार्थ्यांकडून १० ते २० रुपये घेत असल्याच्या तक्रारीही यावेळी पुढे आल्या. स्पीकरवरून लाभार्थ्यांशी संपर्क साधून विचारणा केली असता पैसे घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कारवाई का होत नाही, असा सवाल समितीने उपस्थित केला.
शक्ती योजनेची माहिती देताना अधिकारी सत्याप्पा मैत्री यांनी ऑक्टोबर महिन्यात खानापूर तालुक्यात १ कोटी ८९ लाख ४० हजार ४०८ रुपयांची मोफत प्रवास तिकिटे वितरित झाल्याचे सांगितले. डेपो व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने अन्य माहिती मिळू शकली नाही. मागील बैठकीत मागितलेली माहिती पुढील बैठकीत लेखी स्वरूपात सादर करण्याचा ठराव करण्यात आला. बाहेरील तसेच बेळगावच्या काही बस जुन्या बसस्थानकात येत नसल्याच्या तक्रारीवरही चर्चा झाली. सर्व बस जुन्या बसस्थानकातून नवीन बसस्थानकापर्यंत सोडाव्यात, तसेच करमळ क्रॉस ब्रिज येथे एक दिवस बस नियंत्रकाची नियुक्ती करून व्यवस्था सुधारावी, अशी सूचना करण्यात आली. युवा निधी योजनेचे अधिकारी अनुपस्थित असल्याने या योजनेचा आढावा घेता आला नाही.
बैठकीला समिती सदस्य प्रकाश मादार, बाबू हत्तरवाड, रुद्राप्पा पाटील, शांताराम गुरव, गोविंद पाटील, प्रियांका गावकर, जगदीश पाटील, युसुफ हारगी, इसाखान पठाण, राजा कुडाळे आणि विवेक तडकोड, गॅरंटी योजनेचे कार्यदर्शी व तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta