Sunday , November 22 2026
Breaking News

कोल्हापुरात सीमावासीयांचे ठिय्या आंदोलन; सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी

Spread the love

 

कोल्हापूर : गेल्या सात दशकांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमावासीयांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीमाभागातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. २०) कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बेळगाव, निपाणी, खानापूर, कारवार, बिदर आणि भालकी परिसरातील सीमावासीयांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्थांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सकाळी ११ वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली.

सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकारची भूमिका प्रभावी नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना आणि मागण्या सरकारने गांभीर्याने घेऊन या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

कर्नाटक सरकार बेळगाव येथे विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन सीमाभागावरील आपली भूमिका ठामपणे मांडते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही कोल्हापुरात अधिवेशन घेऊन सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनस्थळी लाल रंगाचे लक्षवेधी फलक घेऊन आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधले. ‘महाराष्ट्रात घ्या, नाहीतर जेलमध्ये टाका’, ‘आता नाही तर कधीच नाही’ आणि ‘महाराष्ट्र शासन करतंय काय?’ अशा घोषणांचा मजकूर फलकांवर झळकत होता. ‘बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणांनी दसरा चौक परिसर दणाणून गेला.

सात दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सीमावासीयांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने आता केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती करावी, अशी भावना या आंदोलनातून व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

गोकुळच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; १२ पैकी १० तालुक्यांत शंभर टक्के मतदान!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत रविवारी (१८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *