Sunday , November 22 2026
Breaking News

अमृतमहोत्सवी वाढदिवशी रवींद्र भोसले यांचा देहदानाचा संकल्प

Spread the love

 

जायंट्स आय फाउंडेशनतर्फे गौरव

बेळगाव : माणसाचे जीवन समाजासाठी उपयुक्त ठरावे आणि मृत्यूनंतरही आपल्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी व्हावा, या उदात्त भावनेतून मठ गल्ली, होसूर येथील श्री. रवींद्र मारुतीराव भोसले यांनी आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून देहदानाचा संकल्प केला.
त्यांच्या या सामाजिक व मानवतावादी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने देहदान करण्याची इच्छा त्यांनी जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष मदन बामणे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर मदन बामणे यांनी स्वतः भोसले यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. देहदान म्हणजे नेमके काय, देहदानाची प्रक्रिया कशी असते, तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी देहदानाचे किती मोठे महत्त्व आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली.

कुटुंबीयांची सहमती आणि रवींद्र भोसले यांची ठाम इच्छा यानुसार त्यांनी जायंट्स आय फाउंडेशनकडे रीतसर देहदान संकल्प अर्ज भरून दिला. या संकल्पाबद्दल त्यांना देहदानाचे प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

न्यू उदय भुवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कौटुंबिक सोहळ्यात जायंट्स आय फाउंडेशनचे अध्यक्ष मदन बामणे, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, संचालक अशोक हलगेकर आणि प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते रवींद्र भोसले यांना देहदान संकल्प प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांना मदन बामणे यांनी देहदान, नेत्रदान आणि त्वचादान यांचे महत्त्व समजावून सांगितले. मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावता येतो आणि अनेक गरजू रुग्णांना मदत करता येते, हा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला व देहदान नेत्रदान यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले .

वाढदिवस म्हटले की आनंदोत्सव, शुभेच्छा आणि भेटवस्तू यांचा विचार केला जातो. मात्र, आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवशी देहदानाचा संकल्प करून रवींद्र भोसले यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा निर्णय केवळ कौतुकास्पद नसून समाजातील इतरांनाही देहदानासाठी प्रेरणा देणारा आहे.

यावेळी उपस्थितांनी रवींद्र भोसले यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या निरोगी व आनंदी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या या महान संकल्पाचे जायंट्स आय फाउंडेशनतर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *