






सुवर्ण स्मृती सभागृहाचे लोकार्पण; विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान आणि शाळेला विविध भेटी
नंदगड : ‘हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला, ते गेलेले क्षण पुन्हा सजवायला… आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला,’ या भावस्पर्शी काव्यपंक्तींनी नंदगड येथील संत मेलगे हायर प्रायमरी शाळेतील १९९२-९३ शैक्षणिक वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भावपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल ३३ वर्षांनंतर रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याच शाळेच्या प्रांगणात सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देत जुन्या स्नेहबंधांना उजाळा दिला.
आपल्या शालेय जीवनातील गोड आठवणी पुन्हा अनुभवण्याबरोबरच आदरणीय गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी शिक्षिका आणि माजी विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. गीता मठस्थ होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी शिक्षिका सौ. देवकी हंदुर आणि श्रीमती लोबो उपस्थित होत्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. अनेकांच्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने वातावरण भावूक झाले.
या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे १९९२-९३ च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय शाळेसाठी उभारलेल्या ‘सुवर्ण स्मृती सभागृहाचे’ लोकार्पण होय. शाळेतील जीर्ण अवस्थेतील सभागृहाचा सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रयत्नांतून कायापालट केला. या सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट आणि टी-शर्ट भेट देण्यात आले. तसेच शाळेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली.
या उपक्रमासाठी एसडीएमसी अध्यक्ष किशोर बिडकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना लक्ष्मण करविनकोप, कृष्णा बिडकर, लक्ष्मण पाटील, कृष्णा कुंभार्डेकर आणि जावेद सकली यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत आणि श्रमदानातून या कार्यात योगदान दिले.
तब्बल ३३ वर्षांनंतर एकत्र येऊन केवळ जुन्या आठवणींना उजाळा न देता आपल्या शाळेच्या विकासासाठीही योगदान देण्याचा आदर्श माजी विद्यार्थ्यांनी घालून दिला. यापुढेही शाळेसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्नेहभोजन आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी या अविस्मरणीय स्नेहमेळाव्याची सांगता झाली.
माजी विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या शाळेप्रतीच्या प्रेमाचे, गुरुजनांप्रतीच्या आदराचे आणि एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta