






सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 19 ऐच्छिक सुट्ट्या जाहीर; सण, जयंती आणि राष्ट्रीय दिनांचा समावेश
बेळगाव : नूतन वर्षाला अद्याप दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच कर्नाटक सरकारने 2027 या आगामी वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन पूर्ण केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2027 मधील सार्वजनिक आणि ऐच्छिक सुट्ट्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात वर्षभरात 18 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 19 ऐच्छिक सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
नव्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची सुरुवात 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीपासून होणार आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, 6 मार्चला महाशिवरात्री, 10 मार्चला रमजान ईद, 26 मार्चला गुड फ्रायडे, 7 एप्रिलला गुढीपाडवा आणि 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
तसेच 1 मे रोजी कामगार दिन, 17 मे रोजी बकरी ईद आणि 16 जून रोजी मोहरमनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी 4 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी, तर 19 सप्टेंबर रोजी महालय अमावस्येची सुट्टी असणार आहे. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, 15 ऑक्टोबरला वाल्मिकी जयंती, 28 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, 31 ऑक्टोबरला दीपावली, 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्योत्सव आणि 16 नोव्हेंबरला कनकदास जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल.
दरम्यान, महावीर जयंती (18 एप्रिल), बसवेश्वर जयंती (9 मे), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट), ईद मिलाद (15 सप्टेंबर) आणि विजयादशमी (10 ऑक्टोबर) हे सण व राष्ट्रीय दिन रविवारी येत असल्याने त्यांचा स्वतंत्र सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. महानवमी 9 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या शनिवारी, तर नाताळ 25 डिसेंबर रोजी चौथ्या शनिवारी येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 19 ऐच्छिक सुट्ट्या
सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 19 ऐच्छिक सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नववर्षारंभ, माधव नवमी, जमात-उल-विदा, रामनवमी, रामानुजाचार्य जयंती, शंकराचार्य जयंती, बुद्ध पौर्णिमा, वरमहालक्ष्मी व्रत, श्रीकृष्ण जन्माष्टमी, स्वर्णगौरी व्रत, अनंत पद्मनाभ व्रत, विश्वकर्मा जयंती, हुत्तरी आणि नाताळची पूर्वसंध्या आदी दिवसांचा समावेश आहे.
आगामी वर्षातील सण, धार्मिक उत्सव, महापुरुषांच्या जयंती आणि राष्ट्रीय दिनांचा विचार करून ही सुट्ट्यांची यादी तयार करण्यात आली असून, राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta