






गोवा, दिव-दमण आणि दादरा-नगर हवेलीची पुन्हा जबाबदारी
खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सचिवांची नवी यादी काँग्रेस पक्षाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली. या नव्या यादीत अंजलीताई निंबाळकर यांची सचिवपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली असून, गोवा तसेच दिव-दमण आणि दादरा-नगर हवेली या प्रदेशांची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पक्षाने या फेरनिवडीच्या माध्यमातून अंजलीताईंच्या कार्यावर आणि संघटनात्मक कामगिरीवर विश्वास व्यक्त केला आहे. जवळपास २५ सचिवांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आले असताना अंजलीताईंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षासाठी त्यांनी आजवर केलेले प्रामाणिक काम आणि संघटनात्मक योगदान याची ही पोचपावती असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
पक्षाकडून मिळालेली कोणतीही जबाबदारी शंभर टक्के निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणे, हे ताईंचे वैशिष्ट्य राहिले आहे. दिवस असो वा रात्र, सण असो वा उत्सव, पक्षाने दिलेले काम पूर्ण करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात. पद मिळाले किंवा गेले, याचा विचार न करता पक्षकार्याला प्राधान्य देणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
ताईंच्या कामाची दखल पक्षातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांकडूनही घेतली जात आहे. राजकारणात पदांपेक्षा संयम, निष्ठा आणि विचारधारेशी बांधिलकी महत्त्वाची असते, या तत्त्वांचे पालन करत त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे.
पदे येतात आणि जातात; मात्र पक्षासाठी केलेले प्रामाणिक काम आणि जपलेली विचारधारा कायम महत्त्वाची असते, हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो.
ताईंच्या या फेरनिवडीबद्दल खानापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta