Friday , October 23 2026
Breaking News

अंबाबाईच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला! ट्रकच्या धडकेत चार मित्रांचा जागीच मृत्यू

Spread the love

पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराडजवळ भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी, कातरखटाव गावावर शोककळा

सातारा : कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कराड शहराजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर घडली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव गावातील सात तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन कारने परतत असताना कराडजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.

जखमींवर रुग्णालयात उपचार

अपघातातील जखमींना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मृत झालेले चारही तरुण एकाच गावातील आणि जिवलग मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. एकत्र देवदर्शनासाठी गेलेल्या मित्रांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या या नव्या सहापदरी उड्डाणपुलावरील हा पहिलाच भीषण अपघात असल्याचे वृत्त आहे. सातारा पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दुष्काळ दौऱ्यात शशिकांत शिंदेंसमोर सीमाप्रश्नाचा मुद्दा; बेळगाव-खानापूरच्या युवा शिष्टमंडळाला भेटण्याचे आश्वासन

Spread the love  रायगड (नरेश पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *