
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला पुन्हा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, पुणे विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक काल सायंकाळी पुणे येथे पार पडली.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर-भालकीचे अध्यक्ष श्री. दिनेश मुधाळे विशेष उपस्थित होते.
बैठकीत खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली
१. बिदर-भालकीची सद्यस्थिती : अध्यक्ष दिनेश मुधाळे यांनी बिदर आणि भालकी तालुक्यातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, मराठी शाळा बंद करण्याचे प्रयत्न आणि कर्नाटक सरकारकडून मिळणारी वागणूक याबाबत विस्तृत माहिती दिली.
२. बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी भागातील बदल : सीमाभागातील बदलती लोकसंख्या, मराठी पाट्यांना होणारा विरोध आणि तरुणांवर दाखल होणारे गुन्हे यावर चिंता व्यक्त करण्यात आली.
३. सीमा प्रश्नावरील सुनावणी : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या सुनावणीबाबत आत्तापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आणि समन्वयक मंत्र्यांनी पुढाकार घेतला, सरकार दरबारी किती पाठपुरावा झाला, याचा आढावा घेण्यात आला.
या चर्चेनंतर बैठकीत एक महत्त्वाचा ठराव करण्यात आला.
येत्या काही महिन्यात केवळ बेळगावपुरता नाही, तर बिदर-भालकी, कारवारसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांना एकत्र घेऊन पुणे-मुंबई येथे एक मोठे जनआंदोलन उभारायचे आणि या आंदोलनाद्वारे संपूर्ण देशाचे लक्ष ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमा प्रश्नाकडे वेधायचे, जेणेकरून हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण होईल.
या बैठकीला पुणे विभागातील पदाधिकारी श्री. विश्वनाथ पाखरे, श्री. गणपती पाटील, श्री. सातेरी पाटील, श्री. वैराळ सुळकर, श्री. मारुती पाटील, श्री. गंगाराम वीर, श्री. अर्जुन वीर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta