Monday , August 24 2026
Breaking News

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये भीषण आग; तीन नवजात बालकांचा मृत्यू

Spread the love

 

अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसएनसीयूतील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर आग लागली. काही क्षणांतच आग आणि धुराचे प्रमाण वाढले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करून कक्षातील इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तीन एसएनसीयू कक्षांपैकी एका कक्षाला आग लागली. या कक्षात १२ नवजात बालके उपचार घेत होती. कर्मचाऱ्यांनी बहुतांश बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले; मात्र धुरामुळे गुदमरल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर काही बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात, तर काहींना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. चार बालकांवर उपचार सुरू असून त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. या बालकाच्या हाताला व पायाला भाजले असून अन्य तीन बालकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

विशेष म्हणजे, या नवीन इमारतीतील एसएनसीयू विभागाला अवघे वर्ष पूर्ण झाले आहे. कमी दिवसांचे, कमी वजनाचे तसेच गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर येथे उपचार केले जातात. त्यामुळे अशा संवेदनशील विभागात आग लागल्यानंतर अग्निशमन यंत्रणा प्रभावीपणे का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, सुमारे सात वर्षांपूर्वी जुन्या इमारतीतील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षालाही शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यावेळी परिचारिकांनी प्रसंगावधान राखून कक्षातील २२ बालकांना सुरक्षित बाहेर काढले होते. मात्र, यावेळी तीन बालकांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष हरपले

Spread the love  कोल्हापूर : प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. डी. वाय. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *