Sunday , August 23 2026
Breaking News

मृत व्यक्तीच्या बनावट स्वाक्षरीने ७२ गुंठे जमीन विकल्याचा आरोप; एकाला अटक

Spread the love

 

बेळगाव : जमीन मालकाचा तब्बल ६० वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असतानाही त्याच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ७२ गुंठे जमीन परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी विष्णू कृष्णराव पाटील (६७, रा. लक्ष्मी नगर, बाळेकुंद्री, के.एच., बेळगाव) याला अटक केली आहे.

या प्रकरणी बसय्या बाळय्या पूजेरी (रा. कुरुबर गल्ली, होन्निहाळ, के.एच. बाळेकुंद्री) यांनी २५ ऑगस्ट २०२५ रोजी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तक्रारदाराचे आजोबा दिवंगत दुंडय्या बसलिंगय्या पूजारी यांच्या नावावर होन्निहाळ गावात पितृार्जित जमीन होती. सर्व्हे क्रमांक ६५/१ मधील ३७ गुंठे आणि सर्व्हे क्रमांक ६५/४ मधील ३५ गुंठे, अशी एकूण ७२ गुंठे जमीन त्यांच्या नावावर होती.

दुंडय्या पूजारी यांचा सुमारे सहा दशकांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, आरोपीने जमीन हडपण्याच्या उद्देशाने त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कागदपत्रे तयार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर ८ एप्रिल २०२४ रोजी बेळगाव दक्षिण उपनिबंधक कार्यालयात खरेदीखत नोंदवून ही जमीन अन्य व्यक्तींच्या नावे विकल्याचा आरोप आहे.

प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी विष्णू पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली. जमीन व्यवहारासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर त्याला २२ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली.

या कारवाईत मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पूजारी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

15 वर्षांनंतर मारीहाळमध्ये महालक्ष्मी यात्रा: यात्रेची तयारी आणि भाविकांच्या सुविधांबाबत लक्ष्मी हेब्बाळकर यांची बैठक

Spread the love  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मारीहाळ गावात सुमारे 15 वर्षांनंतर श्री महालक्ष्मी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *