
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना घडली. मच्छी मार्केट परिसरात एका २५ वर्षीय महिलेने आपल्या दोन लहान मुलांचा गळफास देऊन जीव घेतल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने जयसिंगपूर शहरात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संगीता राजू गाडीवडर (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून प्रगती राजू गाडीवडर (वय ४) आणि प्रतीक राजू गाडीवडर (वय दीड वर्ष) अशी मृत चिमुरड्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे काका दत्ता हे शनिवारी सायंकाळी कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावून तसेच आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. दोन्ही मुले ओढणीच्या साहाय्याने मृतावस्थेत आढळली, तर त्यांची आई संगीता हिने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी झाली.
या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जयसिंगपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta