Monday , August 24 2026
Breaking News

बांगलादेशात हिंदू शिक्षकासह पत्नी व दोन मुलांची हत्या; बंद घरात आढळले चौघांचे मृतदेह

Spread the love

 

ढाका : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका निवृत्त हिंदू शिक्षकासह त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांची घरातच हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दासपाडा परिसरातील बंद घरात शुक्रवारी रात्री या चौघांचे मृतदेह आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी मुग्धो आणि सिद्धार्थ या दोन चुलत भावांना ताब्यात घेतले आहे.

मृतांमध्ये गणपती चक्रवर्ती (६५), पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (५०), मुलगी अगामी चक्रवर्ती प्रार्थी (२३) आणि मुलगा प्रियम चक्रवर्ती (१२) यांचा समावेश आहे. या कुटुंबाचे कोणाशीही ज्ञात वैर किंवा वाद नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

छतावर अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गुरुवारी रात्री दोन्ही संशयित शेजारच्या इमारतीतून चक्रवर्ती यांच्या घराच्या छतावर गेले होते. तेथे ते अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा आरोप आहे. आवाज ऐकून गणपती चक्रवर्ती छतावर गेल्यानंतर संशयितांना पकडले जाण्याची भीती वाटली.

यावेळी संशयितांनी गणपती चक्रवर्ती यांचा गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचीही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेनंतर घर बंद असल्याने कुटुंबीयांशी संपर्क होत नव्हता. अखेर घरातून मृतदेह आढळल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.

या घटनेमुळे रंगपूर परिसरात खळबळ उडाली असून, एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

टँकरची ऑटो रिक्षाला धडक; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; ७ हून अधिक जण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *