Sunday , September 20 2026
Breaking News

अभ्यासासोबत आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रालाही महत्त्व द्यावे; आर. एम. चौगुले

Spread the love

 

उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धांचा आंबेवाडी येथे उत्साहात शुभारंभ

बेळगाव : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष न देता सुदृढ आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व द्यावे. खेळात जय-पराजय येत असतो; मात्र पराभवाने खचून न जाता त्यातून प्रेरणा घेऊन नव्या जोमाने पुढे जाणे हाच खऱ्या खेळाडूचा गुण आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि जिंकण्याची उमेद कायम ठेवून मैदानात उतरल्यास यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन युवा नेते आर. एम. चौगुले यांनी केले.

भगतसिंग हायस्कूल, आंबेवाडी येथे आयोजित उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा शिवाजी अतिवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आर. एम. चौगुले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले.

विद्यार्थी जीवनात अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, उत्तम आरोग्याशिवाय कोणत्याही यशाचा मनसोक्त आनंद घेता येत नाही. त्यामुळे अभ्यासाच्या धावपळीत खेळ, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नये, असे चौगुले यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मैदानावर प्रतिस्पर्धी संघ कितीही बलाढ्य असला तरी त्याचा दबाव मनावर घेऊ नये. विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द आणि आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूमध्ये असणे आवश्यक आहे. पराभव हा शेवट नसून पुढील यशासाठी मिळालेली संधी आहे. पराभवातील चुका ओळखून त्यातून धडा घेत अधिक सक्षमपणे पुनरागमन करणे, हीच खरी क्रीडावृत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘आम्ही जिंकू शकतो’ हा आत्मविश्वास, सांघिक भावना आणि सकारात्मक दृष्टिकोन खेळाडूंना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे निकालापेक्षा खेळातील प्रामाणिक प्रयत्न आणि खिलाडूवृत्तीला महत्त्व द्यावे, असे आवाहनही चौगुले यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी अतिवाडकर होते. प्रमुख वक्ते म्हणून एस. डी. पाटील सर उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक वाय. एम. पाटील, अमोल पाटील, बी. के. कांग्राळी यांच्यासह भाग्यलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन अनिल अतिवाडकर, संचालक मंडळ, शिक्षकवर्ग आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

उचगाव विभागातील विविध शाळांतील विद्यार्थी व खेळाडूंनी या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत विजय-पराजयापेक्षा खिलाडूवृत्ती जपत जिद्द आणि शिस्तीने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

क्रीडा स्पर्धांचा हा सोहळा विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुणांना वाव देणारा आणि त्यांच्यात आत्मविश्वास व सांघिक भावना निर्माण करणारा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *