Sunday , September 20 2026
Breaking News

पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास

Spread the love

 

पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)चे संस्थापक-अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी (18 जुलै) पुण्यात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी, समाजवादी आणि गांधीवादी चळवळीतील एक प्रभावी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता आणि तरुणांच्या सामाजिक सहभागासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.

सोमवारी (20 जुलै) सकाळी 10 ते 12 या वेळेत पुण्यातील गांधी भवन येथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन ठेवण्यात येणार असून, त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

समाजपरिवर्तनासाठी आयुष्य वाहिले

21 ऑगस्ट 1941 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील खेड येथे जन्मलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच सामाजिक कार्याचा मार्ग स्वीकारला. नोव्हेंबर 1967 मध्ये त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या तरुणांच्या प्रभावी संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवकांना समाजपरिवर्तनाच्या आणि पुरोगामी विचारांच्या चळवळीत सक्रिय केले.

मे 1968 मध्ये समाजसेवक बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ येथे आयोजित 15 दिवसांच्या ‘श्रम संस्कार छावणी’च्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या छावणीत सुमारे 1,500 युवकांनी सहभाग घेतला होता.

शोककळा

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून, विविध स्तरांतील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या चळवळीतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *