Sunday , July 26 2026
Breaking News

शट्टीहळ्ळीत आषाढी एकादशीनिमित्त प्राथमिक मराठी शाळेत भक्तिमय पालखी सोहळा

Spread the love

 

विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांनी जिंकली मने

शट्टीहळ्ळी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शट्टीहळ्ळी येथील प्राथमिक मराठी मुलांची शाळा आणि अंगणवाडीच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पालखी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संत संस्कृती आणि आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या वेशभूषा साकारत आकर्षक दिंडी काढली. टाळ, मृदंग, वीणा आणि भगव्या पताका हातात घेऊन विद्यार्थ्यांनी “ज्ञानबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” अशा जयघोषात गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढली. संपूर्ण गाव विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार तसेच समाजातील एकता, सद्भावना आणि सेवाभाव यांचे महत्त्व समजावून सांगितले. अंगणवाडीतील चिमुकल्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पालखी सोहळ्याची शोभा वाढवली.

यावेळी हुबेहूब विठ्ठल-रुक्मिणीचा देखावा साकारण्यात आला. किरण सुतार यांनी दोन दिवसांच्या परिश्रमातून लहान मुलांना सहज उचलता येईल अशी बांबूची सुंदर पालखी तयार करून दिली. तर सुनील कुराडे यांनी आवश्यक ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनी विद्यार्थ्यांसाठी खिचडीची व्यवस्था केली, तर भावेश्वरी मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने सर्वांना केळीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका वैशाली सदलगे, सुरेखा पाटील, बी. एच. केळापगावडे, नैनीता कळविकट्टे, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, रणजित कागणकर, माजी शिक्षक सावंत सर, पालक आणि ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक होण्यास हातभार लागला असून, उपस्थितांनी या अभिनव आणि भक्तिमय उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील लक्ष्मी देवी यात्रा समितीच्या बैठकीत हिशोबावरून गोंधळ

Spread the love  आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले; पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *