Monday , June 1 2026
Breaking News

खानापूरात मराठी माध्यम विभागाचा शुभारंभ; शाळा प्रारंभोत्सव उत्साहात

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहरात यंदापासून सुरू झालेल्या सरकारी माध्यमिक शाळेच्या मराठी माध्यम विभागाचा उद्घाटन सोहळा आणि शाळा प्रारंभोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते नव्या मराठी माध्यम विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तालुका पंचायतचे कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री, शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उपस्थित नागरिक व पालकांशी संवाद साधत या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

खानापूर तालुक्यातील ही पहिली सरकारी मराठी माध्यमिक शाळा असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी हा मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाळेत गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाणार असून आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आयोजित पालक-शिक्षक महासभेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार हलगेकर यांनी केले. तसेच नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, एसडीएमसी अध्यक्ष व सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या मराठी माध्यम विभागाच्या प्रारंभामुळे परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मराठी भाषिक पालकांमधून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

खत टंचाई आणि वीज समस्येवरून खानापूर समिती आक्रमक; तहसीलदार व हेस्कॉमला निवेदन

Spread the love   खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने तालुक्यातील खत टंचाई आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *