Sunday , July 26 2026
Breaking News

कंग्राळी (खुर्द) मराठी शाळेला 1989 ते 96 बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिल्या पन्नास खुर्च्या भेट

Spread the love

 

बेळगाव : कंग्राळी (खुर्द) येथील उच्च प्राथमिक सरकारी मराठी शाळेचा शतकोत्तर वर्धापन दिनाचा कार्यक्रम गेले दोन दिवस मोठ्या उत्साहात पार पडला, या दरम्यान दोन दिवस अनेक कार्यक्रम पार पडले, विविध प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमानी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच माजी शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या १९८९-९० ते १९९५-९६ बॅचच्या माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी या कार्यक्रमादरम्यान आपल्या शालेय जीवनातील असंख्य आठवणींना उजाळा दिला. दोन दिवस सर्वजण जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा, आठवणी आणि भावनिक क्षण अनुभवत पुन्हा एकदा बालपण जगले. शिक्षकांच्या भेटीगाठी, शाळेच्या परिसरातील फेरफटका आणि जुन्या आठवणींनी वातावरण भारावून गेले.

या प्रसंगी बॅचच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून बॅचच्या सर्व मित्र-मैत्रिणींच्या भावना अतिशय प्रभावी व हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केल्या. शाळेने दिलेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन, जपलेली मैत्री आणि शाळेशी असलेले ऋणानुबंध यांचे त्यांनी सुंदर वर्णन केले. त्यांच्या मनोगताला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

शतकमहोत्सवाचे औचित्य साधून १९८९-९० ते १९९५-९६ बॅचच्या माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींच्या वतीने शाळेला ५० खुर्च्यांची भेट देण्यात आली. या भेटीचा स्वीकार करताना प्राध्यापकांनी सांगितले की, शाळेच्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी या खुर्च्या अत्यंत उपयुक्त ठरणार असून माजी विद्यार्थ्यांची ही देणगी शाळेसाठी मोलाची व प्रेरणादायी आहे.

शतकमहोत्सवाने केवळ शाळेच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान केला नाही, तर माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्याचे कार्य केले. हा सोहळा सर्वांच्या स्मरणात कायम राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

गावातील मराठमोळ्या वातावरणात माजी विद्यार्थ्यांनीही विविध कार्यक्रम राबवून शाळेप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. १९८९-९० ते १९९५-९६ च्या विद्यार्थ्यां विद्यार्थिनींनी दिलेल्या या भेटीचा शाळेच्या मुख्याद्यापकांनी आनंदाने स्वीकार करून माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी आनंद पावशे, प्रवीण पाटील, अमर बेन्नाळकर, प्रभाकर खटावकर,
वैशाली पाटील, रेश्मा पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *