योजना कमिटी तालुका अध्यक्ष रमेश जाधव; योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी
निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने राबवलेली पंचहमी गॅरंटी योजना निरंतरपणे कार्यरत असून पदाधिकारी व सदस्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांनी पंचहमी योजनेचा लाभ मिळवून देताना संबंधितांच्या आकडेवारी योग्य पद्धतीने देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी जवाबदारीने काम करावे. योजना प्रभावी ठरण्याचे मत निपाणी तालुका पंचहमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी केले. सोमवारी (ता.१) येथील तालुका पंचायतकार्यालयात आयोजित कमिटी बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक प्रविण कट्टी हे होते. जाधव म्हणाले, पंचहमी गॅरंटी योजना प्रभावी ठरत असताना यामध्ये काही योजनांची सवलत लाभार्थ्यांना मिळवून देताना तांत्रिक अडचणी येत आहेत. तरीही कमिटी पदाधिकारी व सदस्यांनी अशा बाबी हेरून या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सक्षमपणे मिळवून दिला पाहिजे. बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुका पंचहमी कमिटीने या योजनेचे प्रभावी ब्रॅण्डिंग केले आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ सर्वाधिक लाभार्थ्यांना झाला आहे. असे असले तरी पंचहमी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची निश्चित योग्य ती आकडेवारी देण्याची निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांगुर, कारदगा, ढोणेवाडी या गावात धावणाऱ्या बसेस बस स्थानकापर्यंत येत नाही. सध्या महामार्गाचे सहा पदरीकरण केले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने बेळगावहून कोल्हापूरकडे व कोल्हापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या बसेस शहरातून धावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. निपाणी बस आगाराने शहरातील बस वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. अनेक गावात बसस्थानकापासून दूर थांबणाऱ्या बसेस बसस्थानकाजवळच थांबाव्यात अशा सूचना केल्या. अद्यापही ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही अशांनी त्वरित संबंधित खात्याशी संपर्क साधावा असे आवाहन जाधव यांनी केले.
तालुका पंचायतकार्य निर्वाहक प्रवीण कट्टी यांनी या योजनेतील त्रुटी व राज्य सरकारकडून आलेल्या सूचना मांडल्या.
आतापर्यंत महिलांना गृहलक्ष्मीचे २९ महिन्याची रक्कम जमा झाली आहे.
बैठकीस तालुका आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड, हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुला, नेमिनाथ नेमन्नावर, महिला व बालकल्याण खात्याच्या निर्मला कुरबेट, सदस्ययासीन मनेर, तात्यासाहेब कागले, अशोक लाखे, जितेंद्र चेंडके, प्रकाश पाटील
वैशाली खोत, अमीन बुदिहाळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
——————————————————————–
योजना आणि लाभार्थी
महिलांना गृहलक्ष्मीचे २९ महिन्याची रक्कम जमा झाली आहे. याशिवाय तालुक्यातील ९०% मार्क घेतलेल्या दहावी विद्यार्थ्यांच्या ३५६ पैकी २६६ तर पीयूसी परीक्षेत ९०% च्या वर मार्क घेतलेल्या १३७ विद्यार्थ्यांच्या मातांना गृहलक्ष्मीच्या लाभ झाला आहे. २९ महिन्यात १३ कोटी १३ लाख ४२ हजार रु. गृहलक्ष्मीची रक्कम महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे. तर गृहज्योती योजनेचा निपाणी तालुक्यातील ५२ हजार ८६३ तर भोज विभागातील १५ हजार ६२५ जणांना २२ कोटी १८ लाख १३ हजार अशा रकमेचा लाभ मिळाला आहे. तर युवा निधी योजनेतून १ हजार ४० पदवीधर तर डीप्लोमाधारक १४० या लाभार्थ्यांना २ कोटी २९ लाख ७० हजार रकमेचा लाभ मिळाला आहे. तर अन्नभाग्य योजनेपोटी फेब्रुवारी अखेर ५७ कोटी ४८ लाख ४५ हजार रकमेचा लाभ मिळाला असून शक्ती योजनेतून महिन्याला निपाणी विभागातून ३३ हजार ५०० महिला बसने प्रवास करतात.
Belgaum Varta Belgaum Varta