कोल्हापूर : नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असतानाच मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना करवीर तालुक्यात खेबवडे येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. वैभव साताप्पा भोपळे (वय 25, रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हल्लेखोर सुरज सातापा पाटील (वय 25 रा. खेबवडे) हा शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. नवरात्र काळात ही घटना घडल्याने खेबवडे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव, जिल्हा विशेष पथकाचे तानाजी सावंत, इस्पुरलीचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा मध्यरात्रीच खेबवडे येथे दाखल झाला.
या प्रकरणी पोलिस सूत्रांनी सांगितले की, खेबवडे येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवशंभु तरुण मंडळाच्या वतीने यंदा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे मध्यवर्ती चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याऐवजी चौका लगत असलेल्या मंगल कार्यालयात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री देवीची आरती झाल्यानंतर मंडळाचे सर्व कार्यकर्ते चौकात थांबले होते. यावेळी सुरज पाटील तेथे आला. यंदा नवरात्र उत्सवासाठी माझी लाइटिंग का घेतले नाही, असा सवाल त्याने केला. त्याची कार्यकर्त्यांसोबत वादावादी झाली. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने नवरात्र महोत्सव होत असल्याने पुढील वर्षी पाहू, असे सांगून कार्यकर्त्यांनी सुरज याची समजूत काढली. तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नवरात्र उत्सव सोहळ्यासाठी पुढाकार घेणारा वैभव भोपळे याच्याशी संशयिताने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. संशयित आरोपी सुरज पाटील हा वैभव भोपळे याच्या अंगावर धावून गेला. धारदार चाकूने पोटावर आरपार वार केल्याने वैभव जमिनीवर कोसळला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारापुर्वीच तरुणाचा मृत्यू
उपचारापूर्वीच वैभव भोपळे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. तरुणाचा खून झाल्याचे समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. तणावपूर्ण वातावरणात सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित सुरज पाटील पोलिसांना शरण आला. खबरदारीचा उपाय म्हणून खेबवडे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आल्याने शनिवारी खेबवडे येथील वातावरण निवळले आहे, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले.
Check Also
बालविवाह होऊच नयेत, यासाठी मुला-मुलींच्या समुपदेशनावर भर द्या : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
Spread the love अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या तपासण्या करा कोल्हापूर : बालविवाहामुळे मुलींच्या …