मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे स्पष्टीकरण
बंगळूरू : येत्या 2023 च्या विधानसभा निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ते सुशासनासह भाजपला दुसर्यांदा सत्तेवर आणतील.
दिल्लीत एका खासगी वृत्त संस्थेच्या संमेलनात भाग घेऊन बोलताना ते म्हणाले, मी किती काळ मुख्यमंत्री रहाणार आहे हे महत्त्वाचे नाही, या अवधीत मी काय केले हे महत्वाचे आहे. मला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन या काळात उत्तम प्रशासन देण्याचा व पक्ष राज्यात पुन्हा अधिकारावर आणण्याचा माझा प्रयत्न राहील.
भाजप फक्त एका समाजापुरता मर्यादित नाही. हा पक्ष आहे जो समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचे समर्थन मिळवतो. उत्तर कर्नाटकातून लिंगायत समाजातील अनेक भाजप आमदार आणि खासदार आहेत. परंतु एखाद्या पक्षाला सत्तेवर येण्यासाठी, त्याला अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, मागासवर्गीयांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. या वर्गाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप आता कर्नाटकातील समाजातील सर्व घटकांचा पक्ष आहे, असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांनी कर्नाटकात भाजपची चांगली बांधणी केली. मुख्यमंत्रीपदावरून खाली येऊन त्यांनी इतरांना संधी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नीट परीक्षेला तामिळनाडूने विरोध करणे योग्य नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देताना बसवराज बोम्माई म्हणाले.
