224 पैकी केवळ 80 आमदारच उपस्थित
बेळगाव : 2 वर्षांनंतर बेळगावात आज सोमवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ झाला. 10 दिवसीय अधिवेशनाची सर्व जय्यत तयारी प्रशासनाने केली. हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, मंत्री आणि आमदार बेळगावात दाखल झाले. विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या आणि विरोधी सदस्यांनी हजेरी लावली. मात्र पहिल्या दिवशीच्या कामकाजाप्रसंगी बहुतांश आमदार अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.
सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची अनेक आसने रिकामीच दिसून आली. सत्ताधारी पक्षाचे 45, विरोधी 22 आणि जेडीएसचे केवळ 13 आमदार उपस्थित होते. त्यातच जेडीएस प्रमुख कुमारस्वामी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे प्रमुख नेते अनुपस्थित होते. विधानसभेत आज सकाळी कामकाजाला प्रारंभ होताच सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी माजी आ. के. राम भट्ट, डॉ. एम. पी. कर्की, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, अभिनेते पुनीत राजकुमार, एस. शिवराम, प्रा. के. एस. नारायणाचार, माजी मंत्री एस. आर. मोरे, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. रोसय्या, ज्येष्ठ राजकारणी वीरुपाक्षप्पा अंगडी आदी मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शोकप्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या म्हणाले, कर्नाटकचे माजी राज्यपाल असलेल्या के. रोसय्या यांचे राज्याशी चांगले संबंध होते. आंध्र प्रदेशात विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. अनेक वर्षे अर्थमंत्री राहण्याचा मान त्यांना जातो असेही सांगितले.
अभिनेते पुनीत राजकुमार यांना श्रध्दांजली वाहताना मुख्यमंत्री बोम्माई भावुक झाले. अप्पूच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटलेला जनसागर पाहून मी चकीत झालो. अल्प वयात त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. कर्नाटकातील युवकांनी स्पर्धा परीक्षेत चमकावे यासाठी 20 हजारहून अधिक युवकांना त्यांनी प्रशिक्षण दिले होते अशी आठवण बोम्माई सांगितली.
सिद्दरामय्या म्हणाले, देशात सर्वाधिक 16 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम के. रोसय्या यांनी केला. केवळ 46 वर्षांच्या वयात अप्पू यांची लोकप्रियता तर स्तंभित करणारी आहे. कोणाचे निधन झाल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आलेले मी प्रथमच पाहिले. राज्याच्या कानाकोपर्यातूनही लोकांनी अप्पू यांना श्रद्धांजली वाहिली असे सिद्दरामय्या म्हणाले.
Check Also
मराठा बँक पंचवार्षिक निवडणूक : चौघांची माघार; सत्ताधारी पॅनलला विजयी करण्याचे आवाहन
Spread the love बेळगाव : उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक …