Sunday , December 22 2024
Breaking News

पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश

Spread the love

नवी दिल्ली : पंजाब दौर्‍यादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटीं प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दरम्यान, पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
पंजाब सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हालचालींचे संपूर्ण रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवासाचे रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, हे प्रकरण कोणावरही सोडले जाऊ शकत नाही. प्रकरण सीमापार दहशतवादाचे आहे आणि एनआयए अधिकारी या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करू शकतात, असे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पंजाब पोलिस, एसपीजी आणि इतर केंद्र आणि राज्य सुरक्षा संस्थाना रेकॉर्ड सुरक्षित करण्यासाठी आवश्यक मदत देण्याचे आदेश दिले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी झाली आहे. त्याचवेळी पंजाबचे महाधिवक्ता डीएस पटवालिया म्हणाले की, राज्य सरकार या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहे. या घटनेनंतर लगेचच राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. पंजाब आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
लॉयर्स वॉईस संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. मनिंदर सिंग यांनी याचिकाकर्त्याच्या वतीने युक्तिवाद केला आणि ही गंभीर बाब असल्याचे सांगत न्यायालयासमोर चौकशीची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारच्या पॅनलला सोमवारपर्यंत कारवाई करू नये असे सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवार, 10 जानेवारी रोजी होणार आहे. सरन्यायाधीश म्हणाले की चूक, निष्काळजीपणाची कारणे तपासण्याची गरज आहे. सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरलला सांगितले की, आम्ही फक्त चुक शोधत आहोत, कोणी केले वगैरे नाही.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *