Sunday , December 22 2024
Breaking News

खासगी भाजीमार्केट बंद करण्यासाठी एल्गार

Spread the love

बेळगाव (वार्ता) : बेळगावात बेकायदेशीररीत्या उभारलेले खासगी जयकिसान होलसेल भाजी मार्केट बंद करावे, त्याला बेकायदा परवानगी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटना आणि भाजी व्यापार्‍यांनी आज एपीएमसीसमोर भव्य आंदोलन केले.
खासगी होलसेल भाजीमार्केटच्या माध्यमातून बेकायदा खासगी एपीएमसी सुरु करण्यास परवानगी दिल्याचे संतप्त पडसाद बेळगावात उमटत आहेत. त्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटना याला विरोध करत आहेत. शेतकरी आणि सरकारी एपीएमसीतील भाजी व्यापार्‍यांनी मंगळवारी एल्गार पुकारला. बेकायदा परवानगी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी एपीएमसीवर भव्य निषेध मोर्चा काढून एपीएमसीचे आवार दणाणून सोडण्यात आले.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोर्चासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेतली नसल्याचे सांगत पोलिसांनी निदर्शक शेतकर्‍यांना अडवले. मात्र मोर्चा आणि निदर्शनांवर शेतकरी ठाम राहिले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत वाहनात कोंबून नेले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय कृषक समाजकंजे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी म्हणाले, देशभरात सुरु असलेल्या खासगीकरण विरोधातील चळवळीचे लोण आता कर्नाटकात पसरले आहे. विविध जिल्ह्यांतून बेळगावात शेतकरी दाखल होत आहेत. बेळगावात झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात खासगीकरणाचे धोरण रद्द करण्यावर चर्चा करण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र सरकारने अजूनही यावर एक चकार शब्दही काढलेला नाही. मी नेहमी शेतकर्‍यांचा बाजूने उभा राहिलो आहे. त्यामुळे भविष्यात माझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे सरकारला द्यावी लागतील असा इशारा मोदगी यांनी दिला.
दरम्यान, यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आज सायंकाळी सहा बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
शेतकर्‍यांची निदर्शने सुरु असतानाच जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी जयकिसान भाजी मार्केटचे पदाधिकारी, सरकारी एपीएमसीतील व्यापारी आणि शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले. त्यावेळी बोलताना सिदगौडा मोदगी यांनी, जयकिसान भाजीमार्केट बेकायदा उभारले आहे. सरकारी एपीएमसीतील व्यापारी आणि शेतकर्‍यांचे त्यामुळे नुकसान होणार आहे. यावेळी दोन्ही मार्केटच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकार्‍यांसमोर आपले म्हणणे मांडले. यावेळी शेतकरी नेत्यांमध्येच मतभिन्नता दिसून आली. मोदगी आणि रवी पाटील या शेतकरी नेत्यांत भर सभेतच जुंपली.
यावेळी शेतकरी नेते रवी पाटील म्हणाले, सरकारी एपीएमसीचे संचालक आणि प्रशासन शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे रहात नाही. यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याबद्दल मी एपीएमसी सचिव कोडीगौडा यांना निवेदन दिले आहे. तरीही त्यांनी काहीच कार्यवाही केलेली नाही. प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर या खुर्चीत बसा नाही तर बाहेर पडा असे मी त्यांना थेट सांगितले आहे असे पाटील यांनी सभेत सांगितले.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकिसान भाजी मार्केटचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी, अशी किती मार्केट बंद करणार आहेत? याआधी किल्ला भाजीमार्केट बंद केलेत, आता जयकिसान बंद करत आहात. आम्ही काय केवळ भाडी देऊन व्यापार करण्यासाठी यायचे का? असा प्रश्न केला. भाजी मार्केटची जागा लेआऊट बेकायदा असल्याबाबतच्या प्रश्नावर पाटील म्हणाले की आमच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे उत्तर आम्ही दिलेले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी बजावलेल्या नोटीशीलाही उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. तुमच्या शक्तीवर तुम्ही हे आणि सरकारी मार्केटही चालवा. आमच्या मार्केटमुळे शेतकर्‍यांना स्पर्धेमुळे चांगला भाव मिळेल असा दावा त्यांनी केला.
या सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिदगौडा मोदगी यांनी, आजच्या जिल्हाधिकार्‍यांनी बोलावलेल्या जयकिसान भाजी मार्केट, महापालिका आणि बुडा अधिकार्‍यांच्या सभेतून अधिकार्‍यांनी पळ काढल्याचा आरोप केला. आमच्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने अधिकार्‍यांनी काढता पाय घेतल्याचे सांगितले. जिल्हाधिकार्‍यांनी एका महिन्याच्या आत अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यावर यावर कार्यवाही केली नाही तर यात काहीतरी षडयंत्र आहे असे समजून उग्र आंदोलन छेडू असा इशारा मोदगी यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे

Spread the love  बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *