बेळगाव (वार्ता) : गांधीनगरनजीक सुरू करण्यात आलेले जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या बाबतीत ज्या तक्रारी आहेत त्याची चौकशी करून सरकारला अहवाल पाठविला जाईल आणि तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी झालेल्या खाजगी भाजी मार्केट आणि बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सदस्यांसह शेतकरी आणि समाजसेवकांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. खाजगी भाजी मार्केट असलेल्या जय किसान भाजी मार्केटच्या स्थापनेसाठी परवानगी देताना मयत व्यक्तींच्या नावे एनए ले -आऊट करण्यात आला असल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात ज्याने चूक झालेली असेल तर त्यांची चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे कायद्याचे उल्लंघन करून या खाजगी भाजी मार्केटच्या निर्मितीसाठी सहकार्य करणार्या एपीएमसी, हेस्कॉम, महापालिका आदी संबंधित अधिकार्यांची चौकशी केली जाईल आणि त्या अधिकार्यांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस सरकारकडे केली जाईल, असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यवाह डॉ. के. कोडीगौड, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, एपीएमसी व्यापारी सतीश पाटील, बसनगौडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद आदींसह एपीएमसी आणि जय किसान भाजीमार्केटचे सदस्य, शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते बैठकीस बहुसंख्येने उपस्थित होते.
