Thursday , June 4 2026
Breaking News

राज्याचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार शपथबध्द

Spread the love

 

जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री; १३ सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न

बंगळूर : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जल्लोषपूर्ण घोषणांच्या वातावरणात कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी राज्याचे २५वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दलित समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. याशिवाय १३ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

लोकभवनातील ‘ग्लास हाऊस’मध्ये झालेल्या साध्या पण महत्त्वपूर्ण समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

डी. के. शिवकुमार यांनी वीर गंगाधरज्या यांच्या नावाने शपथ घेतली. संविधानाची प्रत हातात धरून पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेत त्यांनी पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे, आतापर्यंत या ठिकाणी होणारे शपथविधी समारंभ पूर्वाभिमुख पद्धतीने होत असत; मात्र ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार शिवकुमार यांनी प्रथमच पश्चिमाभिमुख होऊन शपथ घेतली.

कर्नाटकातील प्रभावी वोक्कलीग समाजातून मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे ते आठवे नेते ठरले आहेत. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बी. आर आंबेडकर यांच्या नावाने शपथ घेतली.

सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न

मंत्रिमंडळाच्या रचनेत प्रादेशिक प्रतिनिधित्व, ज्येष्ठता, पक्षासाठीचे योगदान आणि आगामी निवडणुकांचा विचार करण्यात आल्याचे दिसून आले. नव्या मंत्रिमंडळात तीन वोक्कलीगा, तीन अनुसूचित जाती, तीन लिंगायत, दोन मागासवर्गीय, एक अनुसूचित जमातीचा प्रतिनिधी तसेच ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजातील प्रत्येकी एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.

सतीश जारकीहोळी यांना पुन्हा संधी
बेळगाव जिल्ह्याचे जेष्ठ नेते सतीश जारकीहोळी यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी देण्यात आली आहे. जारकीहोळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळविण्यासाठी उत्सुक होते. परंतु एक व्यक्ती एक पद या हायकमांडच्या धोरणामुळे त्यांना मंत्रिपद गमवावे लागणार असते. यामुळे प्रदेशाध्यक्षपदापेक्षा त्यांनी मंत्रिपद स्वीकारण्यास प्राधान्य दिले. बेळगाव जिल्ह्याच्या दुसऱ्या माजी मंत्री लक्ष्मा हेब्बाळकर यांना पुढील मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे.

शपथविधी सोहळ्यास काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासह विविध राज्यांतील मान्यवर उपस्थित होते. ए. रेवंत रेड्डी, सुखविंदरसिंग सुखू, काँग्रेस नेते राहूल गांधी, आयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, रणदीपसिंग सुर्जेवाला, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीय अशा ५५ सर्वधर्मीय धर्मगुरूंना या सोहळ्यास निमंत्रित करण्यात आले होते. विविध मठांचे स्वामी, बौद्ध भिक्षू, ख्रिश्चन धर्मगुरू तसेच मुस्लिम समाजातील प्रमुख धर्मगुरू उपस्थित राहून सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देण्यात आला.

बंगळूर, म्हैसूर, तुमकूर, गुलबर्गा, विजापूर, बीदर आणि बेळगाव या जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

विद्यार्थी नेतृत्वापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास

डी. के. शिवकुमार यांचा राजकीय प्रवास संघर्ष, संघटनकौशल्य आणि सातत्यपूर्ण जनाधार यांचे उदाहरण मानला जातो. १९८१ मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी संघटने (एनएसयूआय) मधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८५ मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्या विरोधात निवडणूक लढवून पराभूत झाले, मात्र त्यातून त्यांची राजकीय ओळख निर्माण झाली.

१९८९ मध्ये सातनूर मतदारसंघातून प्रथमच आमदार म्हणून निवडून आले. १९९१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांच्या मंत्रिमंडळात कमी वयात मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळविला. १९९४ मध्ये काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवून त्यांनी स्वतःची ताकद सिद्ध केली.

देवेगौडा पिता-पुत्रांवर मात

१९९९ मध्ये एच. डी. कुमारस्वामी यांचा पराभव करून शिवकुमार सलग तिसऱ्यांदा आमदार झाले. त्याच वर्षी एस. एम. कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

२००६ मध्ये देवेगौडा यांच्या विरोधात उमेदवार उभा करून विजय मिळवून देत त्यांनी ‘रणनीतीकार’ अशी प्रतिमा निर्माण केली. सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या शिवकुमार यांनी कनकपूरा मतदारसंघाचा विकास करून त्याला राज्यातील प्रगत भागांपैकी एक बनविले.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. उपमुख्यमंत्रिपदाचा अनुभव घेतल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली असून, कर्नाटकच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

शपथ घेतलेले मंत्री
डॉ. जी. परमेश्वर (कोरटगेरे) – अनुसूचित जाती
एम. बी. पाटील (बबलेश्वर) – लिंगायत
के. जे. जॉर्ज (सर्वज्ञनगर) – ख्रिश्चन
रामलिंगा रेड्डी (बीटीएम लेआऊट) – रेड्डी/वोक्कलीग
सतीश जारकीहोळी (यमकनमर्डी) – वाल्मीकी समाज
प्रियांक खर्गे (चित्तापूर) – अनुसूचित जाती
यु. टी. खादर (मंगळूर) – अल्पसंख्याक
के. एच. मुनियप्पा (देवनहळ्ळी) – अनुसूचित जाती
कृष्णा बैरेगौडा (ब्याटरायनपूर) – वोक्कलीगा
डॉ. यतींद्र सिद्दरामय्या (विधान परिषद) – कुरुब
डॉ. शरणप्रकाश पाटील (सेडम) – लिंगायत
ईश्वर खंड्रे (भाल्की) – लिंगायत
भैरती सुरेश (हेब्बाळ) – कुरुबा

नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून आगामी काळात शिवकुमार सरकारसमोर प्रशासन, विकास आणि निवडणूकपूर्व आश्वासनांची अंमलबजावणी ही प्रमुख आव्हाने असणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शिवकुमार – सिद्धरामय्या आज दिल्लीत

Spread the love  मंत्रिमंडळ यादीला अंतिम स्वरूप, उपमुख्यमंत्री पदावर चर्चा बंगळूर : नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेसंदर्भात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *