Thursday , June 4 2026
Breaking News

विद्यार्थ्यांचीही फेस रिडिंगद्वारे हजेरी; शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Spread the love

 

बेळगाव : शिक्षकांची उपस्थिती कर्तव्य ॲपद्वारे फेस रिडिंगच्या माध्यमातून नोंदविली जात असतानाच आता विद्यार्थ्यांची हजेरीदेखील फेस रिडिंगद्वारे नोंदविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून, यामुळे शिक्षकांच्या कामाच्या ताणात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या शिक्षकांना स्वतःची उपस्थिती कर्तव्य ॲपवर नोंदविताना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्कची समस्या, सर्व्हर डाऊन होणे आणि ॲपमधील त्रुटी यामुळे अनेकदा उपस्थिती नोंदविण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत दररोज प्रत्येक विद्यार्थ्याचे फेस रिडिंग करून हजेरी नोंदविणे व्यवहार्य ठरणार का, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये आधीच शिक्षकांवर अध्यापनाबरोबरच विविध प्रशासकीय आणि शासकीय कामांची जबाबदारी आहे. त्यात आता विद्यार्थ्यांची फेस रिडिंगद्वारे उपस्थिती नोंदविण्याचे अतिरिक्त काम आल्यास अध्यापनाच्या वेळेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षकांचा वेळ तांत्रिक प्रक्रियांमध्ये खर्च होईल, अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनांमधून उमटत आहे.

सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्या कमी होत असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत शिक्षक व्यक्त करीत आहेत. मात्र विविध ॲप्स आणि डिजिटल प्रक्रियांच्या अंमलबजावणीमुळे शिक्षकांना अध्यापनापेक्षा अन्य कामांमध्ये अधिक वेळ द्यावा लागत असल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या फेस रिडिंगसाठी कोणते ॲप वापरण्यात येणार, हजेरी नोंदविण्याची नेमकी कार्यपद्धती काय असेल याबाबत अद्याप सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. मात्र आदेश जारी झाल्याने येत्या काळात विद्यार्थ्यांची उपस्थितीही फेस रिडिंगद्वारे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते, याकडे शिक्षकांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *