ग्रामस्थांचे आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन
बेळगाव (वार्ता) : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या समस्येचे निवारण लवकरात लवकर करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नंदिहळ्ळी ग्रामस्थ आणि साई कॉलनी पहिला क्रॉस कंग्राळी यांच्यावतीने आज बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी ताई हेब्बाळकर यांना देण्यात आले.
यावेळी निवेदनात नंदिहळ्ळी गावातील वाकडेवड्डदेवी देवस्थानकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने येथून ये-जा करणार्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी किंवा नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच येथील गावात लग्न बारसे वाढदिवस यासह इतर कार्यक्रम करण्याकरिता कोणतेही भवन अथवा कार्यालय नसल्यामुळे गावकर्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे गावामध्ये कल्याण मंडप उभारण्याची मागणी यावेळी गावकर्यांनी निवेदनाद्वारे केली.
याबरोबरच साई कॉलनी पहिला क्रॉस मोठी कंग्राळी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने नागरिकांना इतरत्र भटकावे लागत आहे, त्यामुळे या त्रासातून येथील नागरिकांची मुक्तता करावी अशा मागणीचे निवेदन आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांना देण्यात आले.