संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक ४ मध्ये समस्या निवारण सभा पार पडली. सभेत उपतहसीलदार आर. एस. बडचीकर मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद कुमार कब्बूरी यांनी प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेत अश्विनी क्षिरसागर यांनी पोवार चाळीत गटार नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिले. मठपती प्लाॅटमधील नागरिकांनी आपल्या वसाहतीत गटार नाही, रस्ता नाही अन् पथदिवे नसल्याने अंधाऱ्यातून लोकांना ये-जा करावे लागत असल्याचे सांगितले. भरत सुंजे यांनी वसाहतीत गटार नसल्यामुळे सांडपाणी संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरून वाहत असल्याचे सांगितले. दिलीप पाटील यांनी पाणीपट्टी अव्वाची-सव्वा येत असल्याचे सांगितले.
संजय पोवार यांनी एस.डी. हायस्कूल येथील पाण्याचा लोंढा थेट पोवार चाळीत येत असल्याचे सांगितले. सभेत मारुती हातरोटी, रवि नार्वेकर, कुमार भोसले, अरविंद कुराडे, सदा कब्बूरी, विना बचगोळ, शकुंतला पोवार, सुमन चौगुले आणि प्रभागातील नागरिकांनी समस्या मांडल्या. मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद यांनी समस्या निवारण करण्याचे आश्वासन देऊन काढता पाय काढून घेतला.
नगरसेविका गैरहजर
प्रभाग क्रमांक चार मधील नगरसेविका सौ. शेवंता कब्बूरी यांनी सभेला दांडी मारलेली दिसली. प्रभागाच्या समस्यांचे आपल्याला देणे-घेणे नसल्याचे त्यांनी सभेला गैरहजर राहून दाखवून दिले आहे.
गावात सर्वच प्रभागात समस्यांचे रडगाणे
राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या सुचनेनुसार तालुका आणि पालिका अधिकारी संकेश्वरातील २३ प्रभागांत समस्या निवारण सभेचे आयोजन करुन समस्या जाणून घेत आहेत. सर्वच प्रभागात गटार रस्ता आणि मुलभूत सुविधा पुरविण्यात पालिका असफल ठरल्याचे दिसून येत आहे. सर्वच प्रभागात लोक पालिकेच्या नावे शिमगा करतांना दिसताहेत. त्यामुळे नगरसेवक-नगरसेविकांना प्रभागातील लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणे अवघड बनलेले दिसत आहे.