गोव्यात भाजप सरकारचा शपथविधी 28 मार्च रोजी सकाळी पार पडणार
पणजी : गोव्यातील भाजप सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वात स्थापन होणाऱ्या सरकारचा शपथविधी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. ताळगावातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर हा सोहळा संपन्न होणार आहे. गोव्यातील भाजप सरकारच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह 7 विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांसह पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात 7 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधीही पार पाडला जाण्याची शक्यता आहे.गोवा सरकारमधील कॅबिनेट मंत्रिपदांमध्ये मगोपच्या सुदिन ढवळीकरांसह, कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि डॉ. चंद्रकांत शेट्येंना संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर माजी मुख्यमंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर, मॉविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणे, रोहन खंवटे, आणि निलेश काब्राल यांचंही कॅबिनेट नक्की मानलं जात आहे. उत्तर गोव्याला तीन तर दक्षिण गोव्यालाही तीन मंत्रिपद दिली जाणार आहेत. यासह अपक्ष आणि मगोपलाही कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाणार आहे. विश्वजीत राणेंना दुसऱ्या क्रमांकाचं पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.