Saturday , October 19 2024
Breaking News

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी पोलीस आयुक्तांना निमंत्रण

Spread the love


बेळगाव : बेळगावची ऐतिहासिक शतकपूर्ती शिवजयंती आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच मिरवणूक उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रीत केले.

शहरात येत्या 2 ते 4 मे या कालावधीत साजरा केल्या जाणाऱ्या श्री शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेतली. तसेच शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पालखी पूजनाचे यजमानपद भूषविण्यासाठी पोलीस आयुक्तांना निमंत्रण देण्यात आले.

सदर भेटीप्रसंगी शिवजयंती उत्सव तसेच चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून शिवजयंती मिरवणूकीची परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाणार आहे त्यानुसार 2 मे रोजी होणाऱ्या बेळगावच्या पारंपरिक शिवजयंतीची माहिती आयुक्तांना देण्यात आली.

दोन वर्षाच्या खंडानंतर चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन केले जाणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह असणार आहे. या भव्य चित्ररथ मिरवणुकीत 72 हून अधिक शिवजयंती चित्ररथ सहभागी होणार आहेत. बेळगावची जनता शांतताप्रिय आहे. आत्तापर्यंतचा शिवजयंती आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा इतिहास पाहता स्थानिक मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही घटना घडलेली नाही. यापुढेही घडणार नाही, अशी ग्वाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

तथापी सध्या राज्यात चाललेल्या विविध घडामोडी पाहता तसेच अलीकडे डॉ. आंबेडकर जयंतीप्रसंगी देवकी लॉज येथे घडलेला अनुचित प्रकार लक्षात घेता. योग्य त्या उपाययोजना करण्याबरोबरच पोलीस प्रशासनाने चित्ररथ मिरवणूक शांततेत यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाला सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांना यावेळी करण्यात आली. तेंव्हा रमजान ईद, बसव जयंती आणि शिवजयंती हे बेळगावचे वैशिष्ट्यपूर्ण उत्सव असून ते शांततेत पार पाडणे प्रत्येक बेळगावकरांचे कर्तव्य आहे. ध्वनिप्रदूषण होणार नाही या पद्धतीने लाऊड स्पीकरचा आवाज ठेवा, मिरवणूक विनाकारण ताटकळत ठेवू नका, हल्लडबाजीला थारा देऊ नका, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या जाचक अटींबाबत पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती केली तेंव्हा याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.

याप्रसंगी अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासमवेत शिवजयंती उत्सव मंडळाच्या नियंत्रण मंडळाचे सदस्य माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, चित्ररथ स्पर्धा प्रमुख माजी नगरसेवक रणजित चव्हाण -पाटील आणि जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *