बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमिनीची बिगरशेती (एनए) केल्याच्या आरोपावरून बेळगावचे तत्कालीन डीसी अर्थात जिल्हाधिकारी, तहसीलदार, बुडा आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्यासह जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार मारुती पोलीस ठाण्यांमध्ये काल सोमवारी हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रयत संघाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सर्व्हे क्र. 677, 678, 686/1, 686/2, 696/1, 697/2, 698/1 आणि 698/2 अशा एकूण 34 गुंठे जमिनीसाठी जय किसान होलसेल व्हेजीटेबल मर्चंट असोसिएशनच्या दिवाकर पाटील, करीमसाब बागवान, राम गणेश हावळ, उमेश कल्लाप्पा पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी, तहसीलदार व अधिकारी यांच्याकडे एनएसाठी अर्ज केला होता.
यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ले -आऊट नकाशा, बांधकाम परवाना आणि इतर आणि बनावट दाखले तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित जमिनीचे मूळ मालक असलेले बसलींगप्पा भावी आणि इतर जणांच्या नावावर सर्व्हे नंबर असलेली 8 एकर 34 गुंठे जमीन आहे. बसलींगप्पा भावी यांचे 29 नोव्हेंबर 2011 रोजी निधन झाले आहे. जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जय किसान मार्केटची उभारणी करण्यासाठी मृत बसलींगप्पा हे जिवंत असल्याचे भासवून सर्व्हे नंबर 698/1 ही जमीन एनए करण्यासाठी भावी यांची बनावट सही करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्याचप्रमाणे बेकायदेशीर भाजीमार्केटसाठी परवानगी आणि बिगर शेतीसह इतर प्रक्रिया पार पाडण्यासाठी अन्य कागदपत्रेही तयार केली. त्यानंतर 26 जून 2015 रोजी बसलींगप्पा भावी यांच्या नावे बनावट ॲफिडेव्हीट देखील करण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी जमीन बिगर शेती करून ती कमर्शियल एनए केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे लेआउट नकाशा देखील तयार करण्यात आला आणि त्या नकाशावर मृत बसलींगप्पा यांची बनावट सही करण्यात आली.
मृताच्या नावे असलेली संपूर्ण जमीन ताब्यात घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर आदेश करून घेण्यात आला. यामध्ये जय किसान मार्केट सुरू करण्याचा उद्देश होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून वरील दोषींवर कारवाई करावी. तसेच बनावट कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी सिद्धगौडा मोदगी यांनी केली आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून ‘जय किसान’च्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.